प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा चिरनेरच्या शाडू कारखानदारांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 05:12 PM2023-08-17T17:12:18+5:302023-08-17T17:13:44+5:30
...मात्र बाहेरुन विक्रीसाठी येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा चिरनेरच्या शाडू कारखानदारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.
मधुकर ठाकूर -
उरण : पिढ्यांपिढ्यांपासून चिरनेरच्या कलानगरीत फक्त शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. सध्या येथील कारखान्यात शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याच्या कामाची लगबग सुरू आहे.मात्र बाहेरुन विक्रीसाठी येणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचा चिरनेरच्या शाडू कारखानदारांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.
गणपती उत्सवाला फक्त एक महिन्याचाच अवधी उरला आहे.त्यामुळे उरण परिसरातील विविध कारखान्यात "श्री " च्या मुर्तीची कामे उरकण्यात मूर्तीकारांची लगबग सुरू झाली आहे.उरण तालुक्यात चिरनेर ,उरण , बोकडवीरा,डाऊर नगर ,केगाव, चाणजे, करंजा आदी ठिकाणी गणपतीचे हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कारखाने आहेत. उरणमधील बहुतांश गणपतीच्या कारखान्यात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनविण्याकडेच अधिक कल आहे.
मात्र याला शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेले चिरनेर येथील कलानगर अपवाद आहे.चिरनेरच्या कलानगरमध्ये सुमारे २२ ते २५ गणपतीचे कारखाने आहेत. प्रदुषण मुक्त असल्याने शाडूच्या मातीच्या गणेश मुर्तींनाच अधिक मागणी असते.त्यामुळे दरवर्षी या कलानगरात शाडूच्या एक ते चार फुटांपर्यंत सुमारे तीन हजारांहून अधिक गणेश मूर्ती घडविल्या जातात. दरवर्षी ग्राहक ठरलेलेच असतात.त्यामुळे भक्तांच्या आवड आणि मागणीनुसारच गणेश मूर्ती बनविल्या जात असतात. या कलानगरातुन परदेशातही शेकडो मुर्ती दरवर्षी पाठविण्यात येतात.यावर्षी शाडूची माती,रंगाचे भाव २५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.त्याशिवाय कला जोपासणाऱ्या पारंपरिक व्यवसायातील कारागिरांच्या संख्येतही कमालीची घट झाली आहे.यामुळे कारखाने चालविणे मुर्तीकारांना अवघड होऊन बसले आहे. केवल वडिलोपार्जित कला जिवंत ठेवण्यासाठीच गणपतीचे कारखाने सुरू ठेवावे लागत असल्याची खंत येथील मुर्तीकारांकडून व्यक्त केली जात आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार महिने आधीच मूर्तिकार गणेशमूर्ती तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. मात्र उरण तालुक्याच्या बाहेरून पेंटिंग केलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार गणेशमूर्ती विक्रीसाठी येत असल्याने येथील पिढीजात मूर्तिकारांच्या व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. येथील पिढीजात कुंभार समाजाच्या मूर्तिकारांचे ग्राहक वर्षागणिक रोडावत चालले आहेत. त्यामुळे येथील मूर्तिकरांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. खेड्यापाड्यात गणेश मूर्तींच्या विक्रीची दुकाने थाटली गेली असल्यामुळे नव्या ग्राहकांबरोबर जुने ग्राहकही मोठ्या प्रमाणावर कमी झाले असल्याची खंत येथील मूर्तिकारांकडून व्यक्त केली जात आहे. चिरनेर कलानगरीत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याचे काम आत्ता फार कमी झाले आहे.त्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पेण येथून आणून त्यांना रंगकाम करून त्या ग्राहकांना विकल्या जातात.आता फार कमी कारखान्यातून शाडू मातीच्या मूर्ती घडविल्या जात असल्याचे मुर्तीकारांकडून सांगितले जात आहे.
गेल्या पाच पिढ्यांपासून आजपर्यंत कारखान्यात गणेश मूर्ती फक्त शाडूच्याच घडविल्या जातात. त्यामुळे नवे जुने ग्राहक कारखान्यात येऊन दोन महिने आधीच गणेश मूर्ती बुकिंग करतात. ग्राहकांच्या पसंतीच्या फोटो नुसार गणेश मूर्ती आम्ही साकारतो. पण बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तीमुळे आमच्या गणेश मूर्तींच्या मागणीत मोठी घट झाली असल्याची माहिती मूर्तिकार भाई चौलकर, सुनील चौलकर यांनी दिली.
कुंभार समाजाचा हा पिढीजात व्यवसाय असून आत्ता केवळ मूर्तिकला जोपासण्या पुरताच हा व्यवसाय उरला आहे. यामध्ये खूपच चढउतार आहेत. पण या चढ उताराची पर्वा न करता कला टिकवून ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचे मूर्तिकार गजानन चौलकर व नंदकुमार चिरनेरकर यांनी सांगितले.