कोपरखैरणेत स्लॅबचे प्लास्टर कोसळले; जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2019 11:54 PM2019-10-31T23:54:17+5:302019-10-31T23:54:34+5:30
देखभाल दुरुस्तीअभावी इमारतींची सुरक्षा धोक्यात
नवी मुंबई : कोपरखैरणे सेक्टर १० मधील चंद्र्रलोक सोसायटीतील एका घराच्या स्लॅबचे प्लास्टर कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या वेळी जीवितहानी टळली.
कोपरखैरणे सेक्टर १० येथे चंद्र्रलोक सोसायटीमध्ये नगरसेवक रामदास पवळे आपल्या कुटुंबीयांसोबत बिल्डिंग नं.७ ए खोली क्र. ८ मध्ये राहतात. गुरुवारी सकाळी त्यांच्या बेडरूमचा स्लॅब अचानक कोसळला. या वेळी त्यांची सून स्नेहा व सात महिन्यांची नात शिवाज्ञा खोलीत बसल्या होत्या. सुदैवाने दोघींना काहीही इजा झालेली नाही.
कंडोनियम प्रकारची असलेली अनेक घरे अतिधोकादायक असून, महापालिका आणि सिडकोच्या संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची येथील रहिवाशांची तक्रार आहे. सोसायटीत एकूण १८८ घरे असून बहुतांश घरांची दुर्दशा झालेली आहे. स्लॅबच्या लोखंडी सळ्या गंजल्या आहेत, त्यामुळे इमारत कोसळून भयंकर दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
देखभाल दुरुस्तीअभावी सोसासटीची दुरवस्था झाली आहे. येथील अनेक घरांमध्ये गळती लागल्याने स्लॅब कमकुवत झाला आहे. कोपरखैरणे येथील स्लॅब पडण्याच्या घटनेचा अहवाल कोपरखैरणे विभागाचे प्रभारी विभाग अधिकारी समीर जाधव यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्तांना पाठवल्याची माहिती सहायक आयुक्त अशोक मढवी यांनी दिली आहे.
या इमारती साधारण २० वर्षे जुन्या असून, आतापर्यंत १०० हून अधिक घरांमध्ये लहान-मोठ्या दुर्घटना घडल्या आहेत. देखभाल दुरुस्तीअभावी वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अपघातात जीवितहानी अथवा कोणी जखमी झाले नसले तरी सतत स्लॅब पडण्याच्या भीतीने नागरिकांना रात्र जागून काढाव्या लागत आहेत. दरवर्षी या घटना वाढतच असल्याने या इमारतींच्या दुरुस्तीला परवानगी दिली जात नसल्याने मनपा प्रशासनाविरोधात संताप उफाळून आला आहे.