सीवूडमध्ये स्लॅबचे प्लॅस्टर कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2019 01:57 AM2019-07-30T01:57:57+5:302019-07-30T01:58:09+5:30
दाम्पत्य जखमी : नागरिक भयभीत
नवी मुंबई : शहरातील धोकादायक इमारतींच्या स्लॅबची पडझड सुरू असून पावसाळ्यात या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सीवूड सेक्टर ४८ मधील शिवदर्शन सोसायटीतील नीलेश सुर्वे यांच्या घराच्या स्लॅबचे प्लॅस्टर रविवारी रात्री कोसळले, यामध्ये सुर्वे दाम्पत्य जखमी जखमी झाले आहे. स्लॅबचे प्लॅस्टर कोसळण्याच्या घटनांमुळे धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सीवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर सिडकोनिर्मित सोसायट्या असून अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील नागरिक या घरांमध्ये राहतात. काही वर्षांतच सीवूडमधील सिडकोनिर्मित इमारतींची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रविवारी मध्यरात्री सीवूडमध्ये घडलेल्या स्लॅबचे प्लॅस्टर कोसळण्याच्या दुर्घटनेमध्ये नीलेश सुर्वे यांचा पाय मोडला असून यांच्या पत्नीलाही दुखापत झाली आहे. वारंवार घडणाºया या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सिडकोने इमारतींची आणि घरांची डागडुजी करून द्यावी, यासाठी स्थानिक नगरसेवक विशाल डोळस यांनी सिडकोकडे पाठपुरावा केला असून उपोषणाचा मार्गही अवलंबला होता; परंतु प्रत्येक वेळी सिडकोच्या माध्यमातून फक्त आश्वासने देण्यात आल्याचे डोळस यांनी सांगितले. दोन दिवसांत सिडकोने फक्त घरांचेच नाही तर इमारतीचेही काम सुरू केले नाही तर जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा डोळस यांनी दिला आहे.