नवी मुंबई : पर्यावरणास बाधा आणणाऱ्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी असतानाही नवी मुंबईत काही परिसरात मोठ्या प्रमाणात या पिशव्या सर्रास वापरल्या जात आहेत. मंगळवारी घणसोली गावातील एका प्लॅस्टिकच्या वस्तूंची विक्री करणाºया होलसेल दुकानावर महापालिकेच्या घणसोली विभागाच्या अधिकाºयांनी अचानक धाड टाकून सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचा प्लॅस्टिकचा साठा जप्त केला.घणसोली गावातील शंकरबुवा पाटील वाडीतील मरीआई ट्रेडर्स या होलसेल दुकानातून निर्बंध असलेल्या प्लॅस्टिक आणि थर्मोकोलच्या वस्तूंची विक्र ी केली जात असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला मिळाली होती, त्यानुसार महापालिकेच्या परिमंडळ-२ चे उपायुक्त अमरीष पटनिगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांच्या नेतृत्वाखाली वसुली अधीक्षक धर्मेंद्र गायकवाड, अतिक्रमण विभागाचे अभियंते प्रशांत नेरकर आणि विष्णू धनावडे यांच्या पथकाने मंगळवारी दुपारी धाड टाकून प्लॅस्टिक व थर्माकोलच्या वस्तूंनी भरलेला एक टेम्पो जप्त केला. जप्त केलेल्या या वस्तूंची किंमत सुमारे पावणेदोन लाख रुपये इतकी आहे. जप्त केलेला प्लॅस्टिकचा हा साठा तुर्भे येथील एपीएमसीमधील एका गोदामातून विकत घेतल्याची माहिती दुकानाचे मालक रामकुमार स्वामी यांनी दिली आहे. दरम्यान, त्याच्यावर पाच हजार रुपयांच्या दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात आली आहे. शहरातील व्यापारी आणि नागरिकांनी प्लॅस्टिकबंदी मोहिमेला सहकार्य करून नवी मुंबई प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या संकल्पनेला सहकार्य करा, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त अमरीष पटनिगिरे यांनी केले आहे.
घणसोलीतून प्लॅस्टिक, थर्माकोलचा साठा जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 1:27 AM