नवी मुंबई : प्लॅस्टिकचा वापर टाळण्यासंबंधी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्याकरिता प्रशासनाकडून लोकप्रतिनिधींसह ज्येष्ठ नागरिक व विविध संघटनांना प्रोत्साहित करण्यात आले आहे. त्यांच्याकडून संकलित होणाऱ्या प्लॅस्टिकची पालिकेतर्फे विल्हेवाट लावली जाणार आहे.शनिवारपासून राज्यात प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी लागू झाली आहे. त्यानुसार बंदीनंतरही प्लॅस्टिकचा वापर करणाºयास ५ ते २५ हजार रुपये दंड अथवा तिसरी वेळ कारवाई झाल्यास तुरुंगवासाची शिक्षा होवू शकते. दुकानदार, फेरीवाले, मॉलधारक, टपरीचालक यांच्यासह ग्राहकांना देखील या कारवाईला सामोरे जावे लागू शकते. सर्व प्रकारच्या प्लॅस्टिक पिशव्या, थर्माकोल, प्लॅस्टिकचे चमचे, प्लेट आदींचा बंदीत समावेश आहे. परंतु प्लॅस्टिकचा वापर बंदीच्या निर्णयाचे पर्यावरणप्रेमींकडून स्वागत होत असले तरीही काहींचा मात्र विरोध होत आहे. नवी मुंबईत मात्र अद्याप विरोध समोर आलेला नसला, तरीही तो होवू नये याची खबरदारी पालिकेच्या वतीने घेण्यात आली आहे. त्याकरिता लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन केले जात आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळून पर्यावरणाची हानी टाळण्याचे संदेश नागरिकांना दिले जात आहेत. तसेच बंदीनंतर टाकाऊ झालेले प्लॅस्टिक व प्लॅस्टिकच्या वस्तू इतरत्र कुठेही न टाकता ते संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याकरिता देखील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार बंदी लागू झाल्याच्या पहिल्याच दिवशी वाशीतील प्रभाग ६४ च्या नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकच्या पिशव्या संंकलित केल्या आहेत. घरोघरी नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांच्याकडून हे प्लॅस्टिक जमा करण्यात आले आहे. हे प्लॅस्टिक पालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. गायकवाड यांनी प्लॅस्टिकबंदीचा निर्णय झाला तेव्हापासून प्रभागातील नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम हाती घेतलेली आहे. याकरिता त्यांनी गतमहिन्यातच प्लॅस्टिकला पर्यायी कापडी व कागदी पिशव्या बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर देखील ठेवले होते. त्यानुसार वापरावर बंदी असलेले प्लॅस्टिक जमा करण्याच्या त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी ते एकत्रित जमा केले आहे. अशा प्रकारे शहरातून जमा होणाºया संपूर्ण प्लॅस्टिकची योग्यरीत्या विल्हेवाट लावली जाणार असल्याचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी सांगितले.प्लॅस्टिकचा वापर टाळावा यासाठी इतरही लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यालयात संकलन केंद्रे सुरु केली आहेत, तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधनाची मोहीम हाती घेतली आहे. पालिकेने प्लॅस्टिक विरोधी या मोहिमेत ज्येष्ठ नागरिकांना देखील सहभागी करून घेतले आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळल्यास पर्यावरणाची कशा प्रकारे हानी टळू शकते याबाबत ज्येष्ठांचे प्रबोधन केले जात आहे. त्यानंतर या ज्येष्ठांमार्फत घरोघरी जावून जनजागृती अभियान बळकट केले जाणार आहे.
Plastic Ban : प्लॅस्टिकबंदीला शहरवासीयांचा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 1:53 AM