प्लॅस्टिकविरोधात पालिकेची मोहीम तीव्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:10 AM2019-04-04T02:10:57+5:302019-04-04T02:11:07+5:30
पंधरा दिवसांत २६ टन साठा जप्त : दारावेसह एपीएमसी परिसरातही छापासत्र
नवी मुंबई : प्लॅस्टिकविरोधात नवी मुंबई महानगरपालिकेने तीव्र मोहीम सुरू केली आहे. होळीपासून शहरामध्ये तब्बल २६ टन साठा जप्त केला असून, ही राज्यातील सर्वात विक्रमी कारवाई आहे. बुधवारीही विविध ठिकाणी छापा टाकून आठ टनांपेक्षा जास्त माल जप्त केला आहे.
शासनाने राज्यामध्ये प्लॅस्टिकबंदी केली आहे; परंतु हे नियम धाब्यावर बसवून व्यापारी बिनधास्तपणे प्लॅस्टिकचा वापर करत आहेत. भाजी मंडईपासून सर्वच ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनीही नागरिकांना वारंवार आवाहन करून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे. स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबईने देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. देशातील सातव्या क्रमांकाचे शहर म्हणून नवी मुंबईचा नावलौकिक आहे. गतवर्षी घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला होता. शहराचा हा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणीही काटेकोरपणे होणे आवश्यक आहे; पण व्यापारी व नागरिकही याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे अखेर महापालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे.
होळी दिवशी महापालिकेने सीबीडी व एमआयडीसीमध्ये छापा टाकून एकाच दिवशी तब्बल १५ टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. त्यानंतर शहरभर छापासत्र सुरूच आहे. बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, दारावे गाव व इतर ठिकाणी छापा टाकण्यात आला. तब्बल आठ टनांपेक्षा जास्त प्लॅस्टिक जप्त केले आहे. आयुक्त रामास्वामी एन. यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, महावीर पेंढारी, उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, तुषार पवार, विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांच्यासह पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महापालिकेने सुरू केलेल्या कारवाईमुळे प्लॅस्टिकचा अवैधपणे वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. नागरिकांनीही प्लॅस्टिकचा वापर केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महापालिकेने दिला आहे.
बेलापूरमध्ये दहा टन साठा
महापालिकेने २० मार्चला बेलापूर सेक्टर २० मधील सावन हार्मोनी इमारतीच्या मागील भूखंड क्रमांक ८४ वरील इमारतीमध्ये छापा टाकला. याठिकाणी तब्बल दहा टन प्लॅस्टिक व थर्माकोलचा साठा जप्त केला असून ही राज्यातील सर्वात मोठ्या कारवाईमध्ये याचा समावेश आहे.
एमआयडीसीमध्ये कारखाना
सीबीडीमध्ये होळीदिवशी सापडलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांवर पावणे एमआयडीसीमधील प्लॉट नंबर ३३९ वरील कंपनीचा उल्लेख होता. महापालिकेच्या पथकाने तत्काळ त्या कंपनीवर धाड टाकून पाच टन साठा जप्त केला. यामध्ये पिशव्या बनविण्यासाठीच्या कच्च्या मालाचाही समावेश होता.
होळीदिवशी दुकानांवर छापा
धूलिवंदनला रंग उधळण्यासाठी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांचा वापर होण्याची शक्यता असल्यामुळे बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे परिसरामधील ३५ पेक्षा जास्त दुकानांवर छापा टाकून ५३५ किलो प्लॅस्टिक जप्त केले आहे.
रबाळेमध्ये तीन टन साठा
महापालिकेच्या पथकाने २७ मार्चला रबाळे एमआयडीसीमधील आर ५०४ या कंपनीवर छापा टाकला. यामध्ये तब्बल ३ टनपेक्षा जास्त साठा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मालामध्ये प्लॅस्टिकसह थर्माकोलचाही समावेश होता. संबंधितावर एक लाख रुपयांचा दंडही आकारला होता.
एपीएमसीतून तीन टन साठा जप्त
महापालिकेच्या पथकाने बुधवारी एपीएमसीतील माथाडी भवनजवळील दुकानांवर छापा टाकला. दुकानदारांकडून दीड टन साठा जप्त केला व शोभा ट्रेडिंग या व्यावसायिकाकडून दीड टन असा एकूण तीन टनाचा साठा जप्त केला असून त्यांच्याकडून ५० हजार रुपये दंडही वसूल केला आहे.
दारावेमध्येही पाच टन साठा सापडला
बुधवारी महापालिकेच्या पथकाने बेलापूर विभागामधील दारावे सेक्टर २३ मध्ये छापा टाकला. त्याठिकाणी तब्बल पाच टनपेक्षा जास्त साठा आढळून आला आहे. संबंधिताकडून ३० हजार रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे.