पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा आठ लाखांचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 08:19 PM2018-06-01T20:19:44+5:302018-06-01T20:19:44+5:30
नवेल महानगर पालिकेने राज्यात सर्वप्रथम प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता.
पनवेल :पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे . दि. १ रोजी नवीन पनवेल येथील घरावर छापा टाकून सुमारे ८ लाख किंमतीचा प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. पनवेल महानगर पालिकेने केलेल्या आजपर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोती कारवाई आहे.
अतुल संघवी यांच्या मालकीचे हे रो हाऊस आहे . या रो हाऊस मध्ये ठेवलेले प्लॅस्टिक पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वितरित केले जात होते . मागील अनेक महिन्यापासून हा प्रकार सर्रास सुरु होता . पनवेल महानगर पालिकेने राज्यात सर्वप्रथम प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. त्यांनतर देखील पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अशाप्रकारे छुप्या पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्या विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यांनतर आयुक्त गणेश देखमुख यांनी प्लॅस्टिक विरोधी मोहीम आणखी तीव्र केली आहे . आज केलेल्या कारवाईत सुमारे ७ लाखा पेक्षा प्लॅस्टिकचे ग्लास , १२ गोणी प्लॅस्टिक चमचे , १० किलो प्लॅस्टिक पिशव्या व ५ बॉक्स प्लॅस्टिक कंटेनरचा या मध्ये समावेश आहे. संबंधित प्लॅस्टिक बाळगणाऱ्याला सुमारे ५ हजाराचा दंड देखील यावेळी ठोठावण्यात आला आहे .
यावेळी बोलताना आयुक्त देशमुख यांनी सांगितले की, प्लास्टिक बंदी असताना अवैध प्लास्टिक विक्री अजिबात खपवली जाणार नाही. आजच्या कारवाईचा धडा सर्वांनीच घ्यावा . पनवेल महानगर पालिकेला स्वच्छ व स्मार्ट बनविण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे . याकरिता सर्वांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे देशमुख यांनी सांगितले.