विद्यार्थ्यांनी जमा केला प्लास्टिक कचरा; पानथळ दिनानिमित्त उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:47 AM2020-02-04T04:47:33+5:302020-02-04T04:47:54+5:30
कोलाज चित्राचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते अनावरण
नवी मुंबई : महापालिकेचे मुख्यालय सिंगल युज प्लास्टिकमुक्त करण्यात आले आहे. प्लास्टिक प्रतिबंधाच्या दृष्टीने टेरी आणि युएनईपी (संयुक्त राष्ट्र पर्यावरण संस्था) यांच्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घेऊन प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी पुढाकार घेतल्याचे मत महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी व्यक्त केले.
टेरी व युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेन्ट आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने वाशीतील सागर विहार येथे जागतिक पाणथळ दिवसाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये टेरी संस्थेच्या संकल्पनेतून विद्यार्थी, स्वयंसेवक यांनी तयार केलेल्या वृक्षरोपांचे वितरण करण्यात आले.
‘प्लास्टिकविषयी पुनर्विचार’ या संकल्पनेअंतर्गत प्लास्टिक कचºयापासून तयार करण्यात आलेल्या कोलाज चित्राचे अनावरण आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे माजी मुख्य सचिव जे.एस. सहारिया, टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार माजी सनदी अधिकारी जी. एस. गील, भारत सरकारचे उच्च अधिकारी लोविश अहुजा, नवी मुंबई महानगरपालिकेच्या पर्यावरण तदर्थ समिती सभापती दिव्या गायकवाड, उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, डॉ. अंजली पारसनीस, यूएनईपीच्या प्लास्टिक प्रदूषण सल्लागार सलोनी गोयल व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहारिया यांनी रिथींक प्लास्टिक उपक्रमाचे कौतुक करून युवकांचा सहभाग लक्षणीय असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्लास्टिक प्रदुषणाविरुद्ध वैयक्तिक आणि संस्थात्मक पातळीवर भरीव काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी व्यक्त केली.
टेरी संस्थेचे मुख्य सल्लागार निवृत्त सनदी अधिकारी जी.एस. गील यांनी नवी मुंबई शहर इको सिटी बनण्यासाठी महापालिका प्रयत्नशील असून त्यादृष्टीने टेरी संस्था सहयोगाने काम करीत असल्याचे सांगितले. तर प्लास्टिक प्रतिबंधाबाबत एक अभिनव प्रकल्प राबविण्याबाबतही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली.
रिथींक प्लास्टिक संकल्पनेबद्दल बोलताना टेरी संस्थेच्या सहसंचालक डॉ. अंजली पारसनीस यांनी टाकाऊ प्लास्टिक बाटल्यांमध्ये पिंपळ, उंबर, वड अशा देशी वृक्षांची रोपे तयार करून त्यांचे संवर्धन करण्यातून प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनर्उपयोग तसेच पर्यावरण संरक्षण हे विविध हेतू साध्य होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे त्यांनी खारफुटीचे महत्त्वही विषद केले. यावेळी उपस्थित स्वयंसेवक व नागरिकांनी १०० किलोपेक्षा जास्त प्लास्टिक संकलित केले व नवी मुंबई महानगरपालिकेकडे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी प्रदान केले.
उपक्रमात वाशीतील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, आय.सी.एल. महाविद्यालय, नेरूळचे रामराव आदिक तंत्र महाविद्यालय, एस.आय.ई.एस. महाविद्यालय तसेच इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ एनव्हायर्मेंट मॅनेजमेंट, एन.एस.एस.चे विद्यार्थी सहभागी झाले होते.