पनवेल : राज्यात प्लॅस्टिकबंदीचा निर्णय सर्वप्रथम घेणाऱ्या पनवेल महानगरपालिका हद्दीत आजही मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक व थर्माकोलची विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. बुधवारी महापालिका व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल ३६० किलो प्लॅस्टिकसाठा जप्त केला.
महापालिकेचे मुख्यालय असलेल्या पनवेल शहरात कोळीवाडा परिसरातील एका प्लॅस्टिकच्या फॅक्टरीवर धाड टाकण्यात आली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उमेश यादव आणि महापालिकेचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. याअंतर्गत ३६० किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणी दुकानचालकास पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, फॅक्टरी सील करण्यात आली आहे.