खेळाची मैदाने बनली अवैध वाहनतळ, स्थानिकांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 11:26 PM2018-12-02T23:26:50+5:302018-12-02T23:26:54+5:30
प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरातील खेळाची मैदाने बेकायदेशीर वाहनतळे बनली आहेत.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : प्रशासनाच्या नियोजनाअभावी शहरातील खेळाची मैदाने बेकायदेशीर वाहनतळे बनली आहेत. क्रीडा समितीने वारंवार सूचना करून देखील संबंधितांकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. यावरून स्थानिक मुलांची गैरसोय होत असतानाही, मैदानातील बेकायदा पार्किंगवर कारवाईकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. परिणामी विद्यार्थ्यांना मैदानी खेळापासून वंचित राहावे लागत आहे.
मुंबईला पर्यायी शहर म्हणून शहराचा विकास करताना भविष्याचा विचार करून उद्याने, वाहनतळे यांचे नियोजन होणे आवश्यक होते. मात्र तसे न करता केवळ वसाहती उभारण्यावर भर दिला गेला. यामुळे शहरातील ठरावीक नोडचा काही भाग वगळता उर्वरित सर्वच नोडमध्ये पार्किंगची भीषण समस्या निर्माण झाली आहे. दरडोई वाढलेल्या उत्पन्नामुळे तसेच गरज म्हणून घेतलेली वाहने उभी कुठे करायची असा प्रश्न शहरवासीयांना भेडसावत आहे. परिणामी परिसरातील खेळाची मैदाने पार्किंगसाठी बळकावली जात आहेत. अशा प्रकारातून कोपरखैरणे, ऐरोली, वाशी, घणसोली, नेरुळ आदी ठिकाणी तरुणांना खेळासाठी मैदानेच शिल्लक राहिलेली नाहीत. दिवस-रात्र त्याठिकाणी छोटी-मोठी वाहने उभी केली जात आहेत. तर वापरात नसलेली नादुरुस्त वाहने साठवण्यासाठी देखील अशा मैदानांचा वापर होताना दिसत आहे. यामुळे त्याठिकाणी आगीची दुर्घटना घडल्यास संपूर्ण परिसराला धोका निर्माण होवू शकतो.
अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकारामुळे लहान मुलांसह तरुणांना खेळासाठी मैदान मोकळे मिळणे दुरापास्त झाले आहे. तर मैदानी खेळ खेळायचे असल्यास विभागापासून दूरवर असलेल्या मोकळ्या मैदानांकडे धाव घ्यावी लागत आहे. विशेष म्हणजे प्रशासनाच्याच क्रीडा विभागाकडून वारंवार सूचना करुन देखील संबंधित विभागाकडून खेळाची मैदाने खेळण्यायोग्य राखण्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. महापालिकेकडून शहरातून चांगले खेळाडू घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असतात. त्याकरिता वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण केली जात आहे. त्यानुसार क्रिकेट, खो-खो, कबड्डी, हॉलीबॉल अशा खेळात प्रावीण्य मिळवणारे खेळाडू शहरात तयार होत आहेत. परंतु स्पर्धांचा कालावधी वगळता त्यांनी संबंधित खेळाचा सराव करायचा असल्यास तो कुठे करायचा असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडत आहे. त्यामुळे खेळांच्या स्पर्धा घेण्याबरोबरच प्रशासनाने विभागनिहाय खेळाची मैदाने विकसित केली तरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल अशी भावना पालकवर्गाकडून व्यक्त होत आहे. बहुतांश ठिकाणच्या शाळांलगतची मैदाने संबंधित शाळांनी स्वत:च्या ताब्यात घेवून ठेवली आहेत. कोपरखैरणेसह अनेक ठिकाणी नोडमधील खेळाची मैदाने विकसित करण्यासाठी वेळोवेळी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. परंतु प्रत्यक्षात ती मैदाने खेळाऐवजी बेकायदा वाहन पार्किंगसाठी वापरली जात असल्याने खर्च झालेला निधी व्यर्थ जात असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे.
>नागरी वस्तीतली मैदाने गैरसोयीची : बहुतांश ठिकाणी नागरी वस्तीतील खेळाची मैदाने पार्किंगसाठी वापरली जात आहेत. परिसरात वाहन पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यावर तसेच मैदानात वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे स्थानिक मुलांची मैदानी खेळासाठी मैदाने असूनही ती गैरसोयीची ठरत आहेत.
>खासगी शाळांचा मैदानांवर ताबा : बहुतांश खासगी तसेच पालिकेच्या शाळांलगत खेळाची मैदाने राखीव ठेवण्यात आलेली आहेत. परंतु निम्म्याहून अधिक खासगी शाळांनी त्यावर स्वत:चा ताबा मिळून सर्वसामान्यांच्या वापरासाठी बंद केली आहेत. यामुळे परिसरातील मुलांना रस्त्यावर मैदानी खेळ खेळावे लागत आहेत. अशी मैदाने शाळेच्या वेळेव्यतिरिक्त सर्वांसाठी खुली करण्याची अनेकदा मागणी होवूनही प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ती त्यावर खासगी शाळांचाच ताबा कायम आहे.
>मैदानांचा खेळण्यायोग्य विकास हवा : खेळासाठी मैदान राखीव ठेवल्यानंतर त्याचा योग्य प्रकारे विकास होवून जतन होणे महत्त्वाचे आहे. तसे होत नसल्याने मैदाने खेळण्यायोग्य न राहिल्याने तसेच प्रवेशद्वार मोठे केल्याने त्याठिकाणी खासगी वाहनांचा शिरकाव होत आहे. हे टाळण्यासाठी फाटकाच्या रचनेत बदल करून मैदानांचा खेळण्यायोग्य विकास होणे महत्त्वाचे ठरत आहे.
>महापालिका क्षेत्रात ७० खेळाची मैदाने
महापालिका क्षेत्रात सुमारे ७० खेळाची मैदाने राखीव आहेत. त्यापैकी बहुतांश ठिकाणी वाहनांची पार्किंग होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे क्रीडा समितीच्या बैठकीत अनेकदा हा मुद्दा चर्चेला आलेला आहे. सदर ठिकाणची बेकायदा पार्किंग बंद करून मैदाने खेळासाठी मोकळी करावीत अशा सूचना क्रीडा विभागाकडून स्थापत्य विभागासह विभाग कार्यालयांना करण्यात आल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
>सिडकोसह पालिकेच्या नियोजनातील अभावामुळे शहरात वाहन पार्किंगची समस्या भेडसावत आहे. गरजेपोटी घेतलेली वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने ती रस्त्यांलगत अथवा मोकळ्या मैदानात उभी केली जात आहेत. त्यावर प्रशासनाने वेळीच तोडगा काढून प्रत्येक नोडमधील मोठे नाले, गटारे बंदिस्त करून त्यावर वाहनतळ उभारणे काळाची गरज बनले आहे.
- राकेश सावंत,
रहिवासी, कोपरखैरणे