लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बेलापूर सेक्टर-१५मधील मैदानासाठीचा भूखंड सिडकोने लिलाव काढून खासगी शिक्षण संस्थेला देण्याचा डाव आखला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, या विषयावर स्थानिक नगरसेविका पूनम पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला असून, बुधवारी सर्वसाधारण सभेत आवाज उठविण्यात येणार आहे. बेलापूर, शहाबाज, फणसपाडा, दिवाळे गाव व बेलापूर सेक्टर-१५ परिसरामधील नागरिकांसाठी एकही चांगले मैदान नाही. यामुळे सेक्टर-१५ मधील ३३ व ३४ क्रमांकाचा भूखंड हा मैदानासाठीच राखीव ठेवावा, अशी मागणी माजी नगरसेवक अमित पाटील यांनी केली होती. १६ आॅगस्ट २०१२ रोजी सर्वसाधारण सभेत ठरावही मंजूर करण्यात आला होता. या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने सिडकोकडे योग्य पाठपुरावा केला नाही. परिणामी, सिडकोने तो भूखंड खासगी शाळेला देण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा प्रक्रिया तत्काळ थांबवून तो भूखंड परिसरातील नागरिकांना खेळाचे मैदान म्हणूनच ठेवण्यात यावा, अशी मागणी विद्यमान नगरसेविका पूनम मिथुन पाटील यांनी केली आहे. बेलापूरच्या मैदानाचा प्रश्न तत्काळ सोडविला नाही तर धरणे आंदोलन,मोर्चा व उपोषण करण्यात येईल. वेळ पडल्यास न्यायालयातही धाव घेतली जाईल असा इशारा पूनम पाटील, मिथुन पाटील, रूपेश दिवेकर व या परिसरातील सामाजीक संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला आहे. बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्येही याविषयी आवाज उठविण्याचा इशाराही दिला आहे.
मैदानाचा भूखंड विकण्याचा डाव
By admin | Published: June 30, 2017 3:00 AM