बेलापूरमधील मैदानाची डागडुजी
By admin | Published: March 31, 2017 06:41 AM2017-03-31T06:41:11+5:302017-03-31T06:41:11+5:30
आॅक्टोबर महिन्यात नेरुळमधील डी. वाय. पाटील क्रीडासंकुल येथे १७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप होणार आहे
नवी मुंबई : आॅक्टोबर महिन्यात नेरुळमधील डी. वाय. पाटील क्रीडासंकुल येथे १७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपमधील काही मुख्य सामन्यांकरिता या क्रीडासंकुलाची निवड करण्यात आली आहे. तत्पूर्वी खेळाडूंना सराव सामने खेळण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या बेलापूर सेक्टर १९मधील यशवंतराव चव्हाण मैदानाची निवड करण्यात आलेली आहे. गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत यशवंतराव चव्हाण मैदानाचे काम सुरू करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने हिरवा कंदील दिला आहे.
नवी मुंबईत फिफा वर्ल्ड कप ही स्पर्धा शहराच्या नावलौकिकात भर घालणारी असून, या स्पर्धेच्या सराव सामन्यासाठी नवी मुंबई पालिकेच्या मैदानाची निवड झाली आहे. स्पर्धेच्या सराव सामन्यांसाठी पालिकेच्या बेलापूर येथील मैदानाबरोबर वाशीतील नवी मुंबई स्पोर्ट्स असोसिएशनचे मैदान आणि डॉ. डी. वाय. पाटील संकुलातील सराव मैदानाचाही समावेश आहे. शहरातील फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी या माध्यमातून प्राप्त होणार आहे. स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सराव सामन्यांसाठी मैदान विकसित केले जाणार असून, स्पर्धेनंतरही शहरातील फुटबॉल खेळाडंूना एक चांगल्या दर्जाचे आणि सर्व सोई-सुविधांयुक्त मैदान खेळण्यासाठी उपलब्ध होणार आहे. फुटबॉल स्पर्धेचे मुख्य सामने डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार आहेत. १७ वर्षांखालील फिफा वर्ल्ड कपच्या या पर्वाची सुरु वात ६ आॅक्टोबर ते २६ आॅक्टोबर या कालावधीत होणार आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीचा सामनादेखील नवी मुंबईतच होणार आहे. सराव सामन्यांकरिता मैदानात ४३६.०० मीटर लांब, १ मीटर रुंद व १.२० मीटर आरसीसी खोलीचे गटार बांधणे, आरसीसी झाकणे लावणे, मैदानाचे खोदकाम करणे, मैदानावर खडी पुरविणे आणि पसरविणे, मैदानावर नदीच्या वाळूचा २५ सेंटीमीटर जाडीचा थर पसरविणे, स्प्रिंकलर सिस्टीम बसविणे, त्यासाठी आवश्यक तो पाणीपुरवठा विषयक आदी विकासकामे हाती घेण्यात आली असून, १ कोटी ९० लाख रु पयांच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. नवी मुंबईतील फुटबॉल खेळाडू, क्रीडा रसिक, शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी यांना मुख्य सामने पाहण्यासाठी तिकिटात सवलत देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
1 कोटी ९० लाख रु पयांच्या कामाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून यात खेळाडूंसाठी रेस्ट रूम, प्रसाधनगृह, चेजिंग रूमही पालिकेमार्फत बनविण्यात येणार आहे.