११ वर्षाच्या मुलाला खेळणं जीवावर बेतलं; शॉक लागून झाला मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 05:14 PM2021-02-23T17:14:37+5:302021-02-23T17:15:58+5:30
2 Year Old Boy Electrocuted To Death In Airoli Navi Mumbai :इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी उभारलेल्या लोखंडी परांची सोबत हा मुलगा खेळत असताना वरचे टोक वायरीला टेकल्याने हि दुर्घटना घडली.
नवी मुंबई : लोखंडी परांचीमुळे उपरी विद्यत वाहिनीचा शॉक लागून बेघर मुलाच्या मृत्यूची घटना सोमवारी सकाळी ऐरोलीत घडली. इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी उभारलेल्या लोखंडी परांची सोबत हा मुलगा खेळत असताना वरचे टोक वायरीला टेकल्याने हि दुर्घटना घडली.
ऐरोली सेक्टर ८ येथील शिवशंकर प्लाझा या इमारतीच्या आवारात रस्त्यालगत हा प्रकार घडला. या इमारतीच्या तळमजल्यावरील व्यवसायिक गाळ्यांच्या डागडुजीसाठी सुमारे ३० फूट उंच लोखंडी परांची उभारण्यात आली होती. हि परांची इमारतीच्या आवारात उभी करण्यात आली होती. सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास परिसरात सिग्नलवर खेळणी विकणारा सुमारे ११ वर्षाचा मुलगा त्याठिकाणी आला. तो परांची सोबत खेळत असताना ती सरकत रस्त्याच्या कडेला गेली. त्यामुळे परांचीचा वरचा भाग उपरी विद्युत वायरीला चिटकला असता या मुलाला विजेचा शॉक लागला. उपरी विद्युत वायर हि उच्च दाबाची होती. त्यामुळे तिच्यातला विद्युत प्रवाह लोखंडी परांचीमध्ये उतरल्याने क्षणात त्या मुलाच्या शरीराने पेट घेऊन जागीच त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, महावितरण अधिकारी व रबाळे पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. उपरी वीजवाहिनीतीलवीज पुरवठा बंद केल्यानंतर परांची त्या ठिकाणावरून हटवण्यात आली. तर तिथल्या सीसीटीव्हीत संपूर्ण प्रकार उघड झाला असल्याचे वरिष्ठ निरीक्षक योगेश गावडे यांनी सांगितले. दरम्यान या मुलाच्या नातेवाईकांचा शोध लागला असून त्यांचा शोध सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.