स्वार्थासाठी तरुणांच्या भवितव्याशी खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 12:55 AM2021-01-04T00:55:01+5:302021-01-04T00:55:07+5:30
शेअर मार्केटच्या बहाण्याने जुंपले जुगाराला; नवी मुंबईतील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: सीबीडी येथील ऑनलाइन जुगारावरील कारवाईत सूत्रधाराऐवजी कामगारच पोलिसांच्या जाळ्यात फसले आहेत. जुगाराचा सूत्रधार संभाजी पाटील याने शेअर मार्केटमध्ये नोकरीच्या बहाण्याने या तरुणांना सांगलीसह विविध भागातून आणून नवी मुंबईत वेगवेगळ्या जुगाराच्या अड्ड्यावर जुंपले होते. त्यापैकी अनेकांना कित्येक वर्षांपासून पगारदेखील देण्यात आलेला नाही.
गुन्हे शाखा पोलिसांनी सीबीडी येथील ऑनलाइन जुगाराच्या अड्ड्यावरील केलेल्या कारवाईत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यामध्ये सूत्रधार संभाजी पाटील वगळता इतर त्याच्या दुकानावर काम करणारे कामगार तरुण आहेत. त्या सर्वांना संभाजी याने सांगली तसेच इतर भागातून नोकरीच्या बहाण्याने नवी मुंबईत आणले होते. स्वतःचा शेअर मार्केटचा व्यवसाय असल्याचे सांगून त्याने या तरुणांना ऑनलाइन जुगारावर जुंपले होते.
दरम्यान, त्यांना पगारदेखील वेळेवर दिला जात नव्हता. अनेक महिने पगार थकीत ठेवल्यानंतर पाच ते दहा हजार रुपये देऊन त्यांची कोंडी करून ठेवायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून यापूर्वी काहींनी नोकरी सोडून पळदेखील काढला होता. त्यापैकी कित्येकांचे तीन ते पाच वर्षांचे वेतनदेखील संभाजी याने दिलेले नाही. मात्र सीबीडी येथील कारवाईत राजेंद्र पाटील, योगेश काळोखे व प्रमोद खोत हे तिघेही सुशिक्षित आहेत. त्यापैकी एकाचे पोलीस व्हायचे स्वप्न होते व तो पोलीस भरतीमध्येदेखील उतरणार होता. परंतु संभाजीच्या कटकारस्थानामुळे या सर्वांच्या भविष्याची राखरांगोळी झाल्याचा संताप त्यांच्या परिचितांकडून
व्यक्त होत आहे.
एक तरुण बेपत्ता
संभाजी यांच्याकडे नोकरी करणारा एक तरुण मागील सहा वर्षांपासून बेपत्ता असल्याचे समजते.
दहा वर्षे काम करूनही त्याला पगार देण्यात आला नव्हता. त्यामुळे अचानक तो बेपत्ता होण्यामागे घातपाताचे कारण आहे का असा प्रश्न उपस्थित
होत आहे.
साथीदाराला अटक
संभाजी पाटील याने ऑनलाइन जुगारातून कोपरखैरणेत व सांगली येथील मूळ गावी कोट्यवधींची संपत्ती केली आहे. ती ताब्यात घेऊन आजवर फसवणूक झालेल्या तरुणांची त्यातून भरपाई देण्याची मागणी होत आहे. तर खारघर व खांदेश्वर येथील जुगार सांभाळणाऱ्या संभाजीच्या इतर एका साथीदारालादेखील अटक करण्याची मागणी होत आहे.