वन्यप्राण्यांच्या जीवाशी होतोय खेळ, राखीव जंगलात पशुपक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 01:24 AM2020-04-27T01:24:15+5:302020-04-27T01:24:22+5:30

मात्र, याला जेएनपीटीतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले राखीव जंगल अपवाद ठरू लागले आहे.

Playing with wildlife, protecting animals in the reserved forest | वन्यप्राण्यांच्या जीवाशी होतोय खेळ, राखीव जंगलात पशुपक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर

वन्यप्राण्यांच्या जीवाशी होतोय खेळ, राखीव जंगलात पशुपक्ष्यांची सुरक्षा ऐरणीवर

googlenewsNext

मधुकर ठाकूर
उरण : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वनसंपदा, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने कायदे केले आहेत. मात्र, याला जेएनपीटीतील सुमारे २०० हेक्टर क्षेत्रात पसरलेले राखीव जंगल अपवाद ठरू लागले आहे. येथील दुर्मीळ वन्यप्राणी भटकंती व भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनाखाली येऊन हकनाक बळी जात आहेत. वारंवार अशा घटना घडू लागल्या आहेत. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करण्याऐवजी जेएनपीटी प्रशासन आणि वनविभागाचे अधिकारी परस्परांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत.
जेएनपीटी बंदर सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावर पसरलेले आहे. यापैकी १२०० हेक्टर क्षेत्र कांदळवन आणि हरितपट्ट्यासाठी आरक्षित आहे. तर इको पार्कसाठी १६० क्षेत्र आरक्षित ठेवण्यात आले आहे. जेएनपीटी प्रशासन भवनाला लागूनच असलेल्या सुमारे १५० ते २०० हेक्टर क्षेत्रावर राखीव जंगल आहे. जेएनपीटी बंदर उभारण्यात येण्यापूर्वीपासूनच हे जंगल अस्तित्वात असून, या जंगलाच्या सीमेला लागूनच शेवा आणि हनुमान कोळीवाडा ही दोन गावे अस्तित्वात होती.
जेएनपीटी बंदर उभारणीसाठी ही दोन्ही गावे विस्थापित करण्यात आली. त्यानंतर बंदरासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनींचा ताबा आपसूकच जेएनपीटीकडे आला आहे. त्यामुळे वनखात्याच्या अखत्यारीतील राखीव जंगलही जेएनपीटीच्या मालकीचे झाले आहे. या जंगलातच नौदलाच्या एअरफोर्सचा तळही पूर्वीपासून कार्यरत आहे. १९८० च्या दशकात उभारण्यात आलेले जेएनपीटी बंदर आता मे महिन्यात ३२ व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
राखीव जंगल मोर, लांडोर व इतर स्थलांतरित विविध आकर्षक जातीच्या पक्ष्यांच्या वास्तव्यांमुळे आणि किलबिलाटाने गजबजले आहे. याशिवाय दुर्मीळ जातीचे कोल्हे, भेकरे, ससे, माकडे, रानडुक्कर, रानमांजर आदी वन्यप्राणीही मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहेत. जंगलातील दुर्मीळ कोल्हे, भेकरे भक्ष्याच्या शोधात अनेकदा रात्रीच्या वेळी जंगलाबाहेर पडतात. मात्र, जेएनपीटीच्या बंदरातील कंटेनर वाहतुकीमुळे अपघात होऊन त्यांचा बळी जात आहे.
>‘वनविभागाला सहकार्य करणार’
जेएनपीटी परिसरातील विविध रस्त्यांवर अशा घटना वारंवार घडत असून त्यामुळे वन्यजीवांना प्राणास मुकावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याबाबत जेएनपीटी गांभीर्याने विचार करीत असल्याचे प्रोजेक्ट, प्लॉनिंग अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट विभागाचे व्यवस्थापक व्ही. जी. घरत यांनी सांगितले.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चर्चा करण्याची तयारीही जेएनपीटीने दाखविली आहे. वन्यजीवांच्या संरक्षणासाठी वनविभागाने प्रस्ताव दिल्यास जेएनपीटी सहकार्य करेल, अशी माहितीही घरत यांनी दिली.

Web Title: Playing with wildlife, protecting animals in the reserved forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.