नवी मुंबई : माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिन म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त कोकण भवनमध्ये शुक्रवारी भारतरत्न राजीव गांधी यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कोकण विभागीय उपायुक्त (महसूल) विवेक गायकवाड यांनी उपस्थितांना यावेळी सदभावना प्रतिज्ञा दिली.
केंद्र शासनाच्या निर्देशानूसार राज्य शासनाने 18 जानेवारी 2023 च्या शासन परिपत्रकान्वये 20 ऑगस्ट 2023 माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त ‘सदभावना दिन’ साजरा करण्याचे आदेश निर्गमीत केले अहेत. त्यानुसार राजीव गांधी यांची जयंती ‘सदभावना दिन’म्हणून साजरी केली जाते. या दिवशी, प्रदेश, धर्म, भाषा यांचा विचार न करता सर्वलोकांच्या भावनिक ऐक्यासाठी आणि सद्भावनेसाठी शपथ घेतली जाते. 20 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी असल्याने शुक्रवारी कोकण भवनात दिवंगत राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच कोकण भवनातील पहिल्या मजल्यावर असलेल्या आयुक्त कार्यालयाच्या समिती सभागृहात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा देण्यात आली.