नागोठणेतील आंबा नदीवरील ऐतिहासिक पुलाची दुर्दशा
By Admin | Published: May 11, 2016 02:16 AM2016-05-11T02:16:32+5:302016-05-11T02:16:32+5:30
येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे
नागोठणे : येथील अंबा नदीवर ७०० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या ऐतिहासिक पुलाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पुलाच्या बांधकामात झाडे उगवण्यास प्रारंभ झाला आहे. पाया सुद्धा काही अंशी ढासळत आहे. या ऐतिहासिक पुलाचे जतन करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
येथील अंबा नदीवर नागोठणे व वरवठणे गावांना जोडणारा पूल असून तो फक्त चुना, गूळ आणि अंडीच्या मिश्रणातून ७०० वर्षांपूर्वी बांधला होता, अशी नोंद आहे. दरवर्षी पुराचे फटके खाऊनही तो आजही ताठ मानेने उभा आहे. या पुलावरून रोह्याकडे जाता येत असल्याने रिलायन्सकडे जाणारा नवीन पूल बांधल्यानंतर या जुन्या पुलावरून जाणारी अवजड वाहतूक तत्कालीन युती सरकारच्या काळात पूर्णपणे बंद करण्यात आली होती. पुलाच्या दोन्ही बाजूला सध्या झाडे उगवली असल्याने पुलाच्या बांधकामाला धोका पोहोचत आहे. गतवर्षी सार्वजनिक बांधकाम खात्याने या पुलाची पाहणी केली व त्यानंतर डागडुजी करण्याचा अहवाल तयार केला होता. वर्षभरात कोणत्याही कामाला प्रारंभ न झाल्याने नागरिकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित के ले आहे.