ऐरोलीतील भूखंड २.६७ लाख चौ. फूट!, सिडकोला मिळाला विक्रमी दर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:15 AM2019-12-07T03:15:42+5:302019-12-07T03:15:48+5:30
देशभर आर्थिक मंदी सुरू आहे.
नवी मुंबई : सिडकोने शहरातील पाच भूखंडांच्या विक्रीसाठी निविदा मागविल्या होत्या. ऐरोली सेक्टर ७ मधील भूखंड क्रमांक १७ साठी प्रतिचौरस फूट दोन लाख ६७ हजार ७८६ रुपये दर प्राप्त झाला आहे. सर्व पाच भूखंडांच्या विक्रीतून सिडकोला तब्बल २२९ कोटी रुपये महसूल प्राप्त होणार आहे.
देशभर आर्थिक मंदी सुरू आहे. नवी मुंबई परिसरामध्येही सर्वच उद्योगासह बांधकाम व्यवसायामध्येही समाधानकारक उलाढाल होत नसल्याचे बोलले जात होते. अशा स्थितीमध्ये सिडकोचे भूखंड विक्रमी दराने विकले जात आहे. ऐरोली व वाशीमधील पाच भूखंडांसाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ऐरोली सेक्टर ७ मधील भूखंड क्रमांक १७ हा निवासी व वाणिज्य वापरासाठी प्रस्तावित आहे. या भूखंडाच्या खरेदीसाठी सर्वाधिक दोन लाख ६७ हजार ७८६ रुपये दर प्राप्त झाला आहे. आधारभूत किमतीपेक्षा दुप्पट दराने भूखंडाची विक्री झाली आहे. या व्यवहारातून सिडकोला तब्बल ४१ कोटी ७७ लाख ४७ हजार रुपये मिळणार आहेत. या परिसातील सेक्टर ८ मधील भूखंड क्रमांक २६ साठी दोन लाख ५१ हजार ९१७ रुपये व वाशी सेक्टर १८ मधील भूखंड क्रमांक ३ - १ ए ला एक प्रतिचौरस फूट एक
लाख ६६ हजार रुपये दर प्राप्त झाला आहे.
सिडकोने विक्री केलेल्या पाचपैकी दोन भूखंड निवासी व वाणिज्य वापरासाठी आहेत. वाशीमधील दोन्ही भूखंड वाणिज्य वापरासाठी आहेत. सिडको भवनमध्ये शुक्रवारी ई-लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली. ई-लिलाव व ई-निविदा प्रक्रियेअंतर्गत अर्ज नोंदणी, अनामत रकमेचा भरणा, निविदा भरणे या सर्व प्रक्रिया सुलभ पारदर्शक व जलद अशा आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात आल्या. यामध्ये आॅनलाइन बंद निविदा सादर करणे निविदाकारांना अनिवार्य होते. बंद निविदा सादर करणाऱ्या निविदाकारांनाच पुढील टप्प्यातील ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होता येणार होते. पारदर्शीपणे ही प्रक्रिया पार पाडली असल्याचेही सिडको प्रशासनाने स्पष्ट केले.
भूखंडनिहाय तपशील पुढीलप्रमाणे
भूखंड क्षेत्रफळ प्राप्त दर एकूण रक्कम
ऐरोली सेक्टर ७ १,५६० २,६७,७८६ ४१ कोटी ७७ लाख
ऐरोली सेक्टर ८ १,७९६ २,५१,९१७ ४५ कोटी २६ लाख
ऐरोली सेक्टर १९ १,९६९ १,२९,६६९ २५ कोटी ५४ लाख
वाशी सेक्टर १८ ३,८५० १,६६,८४६ ६४ कोटी २४ लाख
वाशी सेक्टर १८ ३,८४६ १,३६,००० ५२ कोटी ३० लाख