नवी मुंबई : सिडकोच्या भूखंडांची कोटींची उड्डाणे सुरूच आहेत. नेरूळ व खारघरनंतर आता घणसोलीतील भूखंडांनाही कोटींचा दर प्राप्त झाला आहे. येथील सेक्टर ८ मधील तीन भूखंड तब्बल २२१ कोटींना विकले गेले आहेत. त्यामुळे भविष्यात नवी मुंबईतील घरेही महाग होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तविली जात आहे.घणसोली सेक्टर ८ येथील ४८१२ चौरस मीटर क्षेत्रफळांच्या तीन भूखंडांच्या विक्रीसाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या. या तिन्ही भूखंडांना विक्रमी दराच्या निविदा प्राप्त झाल्या. हे तिन्ही भूखंड १ लाख ६१ हजार, १ लाख ५४ हजार आणि १ लाख ४५ हजार रुपये प्रतिचौरस मीटर दराने विकले गेले आहेत. या तिन्ही भूखंडांच्या विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत तब्बल २२१ कोटींची भर पडली आहे. हे सर्व भूखंड निवासी व वाणिज्य वापरासाठी आहेत. यापूर्वी नेरूळ येथील भूखंडाला २ लाख ८२ हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाला होता. तर खारघर येथील भूखंडही जवळपास याच दराने विकले गेले होते. यावरून येत्या काळात शहरातील मालमत्ता आणखी महाग होण्याची शक्यता या क्षेत्रातील जाणकारांकडून वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
घणसोलीत भूखंडांची कोटींची उड्डाणे
By admin | Published: August 08, 2015 10:13 PM