फुल उत्पादक शेतकऱ्यांची लूट
By admin | Published: November 11, 2015 02:30 AM2015-11-11T02:30:10+5:302015-11-11T02:30:10+5:30
दिवाळीनिमित्त मुंबईत झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी राज्यभरातील शेतकरी फुलांची विक्री करण्यासाठी मुंबईकडे येतात
नामदेव मोरे, नवी मुंबई
दिवाळीनिमित्त मुंबईत झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी राज्यभरातील शेतकरी फुलांची विक्री करण्यासाठी मुंबईकडे येतात. परंतु अशा शेतकऱ्यांच्या मालाला कमी भाव दिला जात आहे. स्वत: विक्री करणाऱ्यांना धमकावले जात असून त्यांच्याकडील हजारो रुपयांच्या फुलांची चोरी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या या लूटीकडे राज्यकर्त्यांसह पोलीसही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
दिवाळीनिमित्त ५०० टनांपेक्षा जास्त फुले मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात विक्रीला येत असतात. पुणे, सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी झेंडूच्या फुलांची शेती करीत आहेत. तीन महिने दिवसरात्र मेहनत करून फुले पिकविली आहेत. चांगला बाजारभाव मिळावा यासाठी शेतकरी त्यांच्याकडील फुले मुंबईला विक्रीसाठी घेऊन येत आहेत. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना फोन केल्यानंतर चांगला बाजारभाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले जाते. परंतु येथे आल्यानंतर मात्र फुलांना योग्य भाव दिला जात नाही. अनेकांना उत्पादन व वाहतुकीच्या खर्चाएवढेही पैसे मिळत नाहीत.
सातारा जिल्ह्यातून फुलांची विक्री करण्यासाठी काही शेतकरी सोमवारी रात्री दादरला आले होते. ज्या व्यापाऱ्यांनी त्यांचा माल खरेदी करण्याचे व चांगला बाजारभाव मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते त्याने माल चांगला नसल्याचे कारण सांगून खरेदी करण्यास नकार दिला. कर्ज काढून तीन महिने फुलांच्या शेतामध्ये राबल्यानंतर आता
त्यांची विक्री होत नसल्याचे ऐकून धक्काच बसला.
निराश न होता शेतकऱ्यांनी रस्त्याच्या कडेला स्वत:च फुलांची विक्री सुरू केली. ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. परंतु तेथील काही समाजकंटकांनी शेतकऱ्यांना धमकावून तेथून पळवून लावण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या गाडीतील १५ हजार रुपयांचा माल चोरला. पोलिसांनी दखल घेतली नाही. व्यापारी, पोलीस व चोरट्यांचे संगनमत असल्याचा संशय आल्यामुळे शेतकऱ्यांनी शिल्लक राहिलेला माल पनवेल परिसरातील कामोठे विभागात रस्त्यावर त्याची विक्री केली.