पे अॅण्ड पार्कच्या नावे लूट
By admin | Published: April 25, 2017 01:25 AM2017-04-25T01:25:24+5:302017-04-25T01:25:24+5:30
पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा वसाहत याठिकाणी पार्किंगची
तळोजा : पनवेल महापालिका क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेल्या तळोजा, खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा वसाहत याठिकाणी पार्किंगची मोठी समस्या आहे. त्याठिकाणी अव्वाचा सव्वा दर आकारण्यात येत असून सिडको व ठेकेदारामार्फत पार्किंग चालवले जात असून ही लूट तत्काळ थांबवावी, अशी मागणी भाजपाचे नेते व बिमा कॉम्प्लेक्स अध्यक्ष रामदास शेवाळे यांनी केली आहे.
कळंबोलीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे लोखंड मार्केट आहे. याठिकाणी असलेल्या पे अँड पार्किंग परिसरात दमदाटी करून अवजड वाहन चालकांकडून शेकडो रुपये उकळण्यात येत आहेत. या बदल्यात त्यांना कोणतीही सोयी- सुविधा मिळत नसल्याचा आरोप चालक मालकांकडून केला जात आहे. सिडकोने या प्रकारावर पांघरून घातल्यानंतर महापालिका देखील हाच पाढा गिरवत असल्याने नागरिकांकडून नाराजीचा सूर उमटत आहेत.
कळंबोली शहरात बाहेरून येणाऱ्या राज्यातून वाहनांना रात्री अडवून सिडकोच्या पावत्या देऊन शेकडो रु पये आकारले जात असल्याचे वाहनचालकांचे म्हणणे आहे.
कळंबोली स्टील मार्केट परिसरात येणाऱ्या अवजड वाहनांना पार्किंगची लूट व येथील दादागिरीचा सामना करावा लागत असल्याने ही वाहने शहरातील अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जात आहेत. ही लूट लवकरात लवकर थांबवावी व नागरिकांना पार्र्किं गसाठी भूखंड उपलब्ध द्यावा आणि याठिकाणी मोफत पार्किंग देण्याची मागणी शेवाळे यांनी केली आहे.