अंनिससाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही; मारेक-यांना पकडण्यात अपयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 03:07 AM2018-01-21T03:07:23+5:302018-01-21T03:07:44+5:30
नरेंद्र दाभोळकर हत्येच्या सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागूनही ती मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई : नरेंद्र दाभोळकर हत्येच्या सीबीआयमार्फत सुरू असलेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागूनही ती मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे गुन्ह्याच्या तपासात राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसत आहे. तर न्यायालयाने फटकारल्यानंतरही फरार मारेकºयांना अटक होत नाही, ही शर्मेची बाब असल्याचेही ते सीबीडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येला ५४ महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या कालावधीत अवघ्या एकाला अटक झाली असून, उर्वरित फरार असलेल्या मारेकºयांना अद्याप अटक झालेली नाही. या गुन्ह्याचा तपास सीबीआय करत असल्याने आजवर झालेल्या तपासाच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भेटीसाठी अनेकदा वेळ मागण्यात आली आहे; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करूनही पंतप्रधानांची वेळ मिळत नसल्याची खंत हमीद दाभोळकर यांनी व्यक्त केली आहे. यावरून सिनेअभिनेते, उद्योजक यांच्यासाठी सहज उपलब्ध होणारे पंतप्रधान अंनिसच्या कार्यकर्त्यांची भेट टाळण्यामागच्या कारणांवर संशय व्यक्त होत आहे. तर दाभोळकरांच्या हत्येच्या तपासात राजकीय इच्छाशक्ती दिसत नसल्याचीही नाराजी त्यांनी व्यक्त केली. दाभोळकरांचे मारेकरी एका ठरावीक विचारांशी बांधील होते. याच विचारांचा देशाच्या राजकीय पार्श्वभूमीशी संबंध आहे. यामुळेच दाभोळकरांचे मारेकरी अद्याप फरार असल्याने विवेकवादी विचारांच्या व्यक्तींना त्यांचा धोका असल्याची भीतीही त्यांनी सीबीडी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
तीन वर्षांत पाच तपास अधिकारी बदलले गेले असून, मागील दीड महिन्यांपासून दाभोळकरांच्या हत्येच्या गुन्ह्याला तपास अधिकारीच नाही. यामुळे तपासाकरिता शासनाने स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी अंनिसचे प्रधान सचिव माधव बावगे, सुशीला मुंडे, मिलिंद देशमुख यांच्यासह
नवी मुंबईचे पदाधिकारी उपस्थित होते.