मोदींचा नवी मुंबई दौरा; सुरक्षेसाठी ४,०००हून अधिक पोलिस, पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 01:32 PM2024-01-10T13:32:10+5:302024-01-10T13:34:04+5:30

सभेला १ लाख लोक येणार

PM Modi visit to Navi Mumbai so More than 4,000 police, Commissioner of Police reviewed for security | मोदींचा नवी मुंबई दौरा; सुरक्षेसाठी ४,०००हून अधिक पोलिस, पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा

मोदींचा नवी मुंबई दौरा; सुरक्षेसाठी ४,०००हून अधिक पोलिस, पोलिस आयुक्तांनी घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नवी मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (सागरी सेतू पूल) व इतर विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. यासाठी नवी मुंबईत मोदींचे आगमन होणार असल्याने त्यांच्या सुरक्षेवरून पोलिसांनी दिवसरात्र एक केला आहे. कार्यक्रमस्थळासह संपूर्ण परिसरात व महत्त्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. त्यासाठी चार हजारांहून अधिक पोलिस व राखीव बल कार्यरत राहणार आहेत.

हा सोहळा उलवे येथील विमानतळ क्षेत्रात मोठ्या थाटात होणार आहे. त्या अनुषंगाने मागील काही दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेचा चोख आराखडा तयार केला जात आहे. कार्यक्रमस्थळी व मोदींच्या आगमन मार्गावर सुरक्षेची कोणतीही कमी राहणार नाही, याकडे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे त्यांच्याकडून बारकाईने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेतल्या जात आहेत.

जागेचा घेतला ताबा

पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेकडून सभास्थळाची पाहणी झाल्यापासून पोलिस त्या ठिकाणी तळ ठोकून आहेत. सभामंडपाची तयारी सुरू असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतरांना परिसरात प्रवेशबंदी केली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे पोलिसही मदतीला

मोदींच्या सभेसाठी एक लाखाहून अधिक नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्यासह मोदी व इतर मान्यवरांच्या सुरक्षेवर पोलिसांकडून भर दिला जात आहे. त्यासाठी ४ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्तावर नेमले जाणार आहेत. त्यामध्ये नवी मुंबई पोलिसांच्या मदतीला मुंबई, ठाणे, पुणे येथील पोलिसांसह राखीव दलाच्या तुकड्या आदींचा समावेश आहे. वाहतुकीच्या नियोजनावर भर शुक्रवारी शहरात कुठेही वाहतूककोंडी होऊ नये यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्वच मार्गांवर अवजड वाहनांना प्रवेशबंदी व पार्किंगसाठी बंदी घालण्यात आली आहे.

सोबत काही आणण्यास मनाई

कार्यक्रमासाठी एक लाखाहून अधिक नागरिक येण्याची शक्यता आहे. त्यांची तपासणी करूनच सभेच्या मैदानात प्रवेश दिला जाणार आहे. यावेळी कोणतीही वस्तू, साहित्य आत नेऊ दिले जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सभेसाठी येताना सोबत काहीही आणणे टाळावे. 
- मिलिंद भारंबे, पोलिस आयुक्त

Web Title: PM Modi visit to Navi Mumbai so More than 4,000 police, Commissioner of Police reviewed for security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.