पीएमसी खातेदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 09:18 PM2019-11-02T21:18:24+5:302019-11-02T21:22:31+5:30
पीएमसी बँक खातेदार पैसे बँकेत अडकल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत.
वैभव गायकर
पनवेल - पंजाब अँड महाराष्ट्र बँकेच्या आणखी एका खातेदाराचा खारघरमध्ये मृत्यू झाला आहे. खारघर सेक्टर १० मध्ये राहणाऱ्या कुलदीप कौर विग (६४) असे या खातेदाराचे नाव आहे. सध्याच्या घडीला लाखो पीएमसी बँक खातेदार पैसे बँकेत अडकल्याने अनेकजण हवालदिल झाले आहेत.
मंगळवारी पीएमसी खातेदारांची मुंबईस्थित निदर्शन होती. यासंदर्भात बातम्या वृत्तवाहिन्यांवर दाखविल्या जात असताना कुलदीप कौर यांनी संबंधित बातम्या बघून आपले पती वरिंदर सिंग विग यांना आरबीआय यासंदर्भात अद्याप तोडगा काढत नसल्याने आपणास आपले पैसे परत मिळतील का ? असा प्रश्न उपस्थित केला.यावेळी वरिंदर सिंग वीर यांनी हा विषय सोडून देवून सर्वकाही देवावर आहे. असे उत्तर दिले.मंगळवारी सकाळी ११.३० च्या प्रसंगानंतर कुलदीप कौरला अस्वस्थ वाटू लागले.दुपारी दोन च्या सुमारास कुलदीप यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कुटुंबीयांनी त्यांना नजीकच्या खाजगी दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यापूर्वी कुलदीप यांना हृदयविकाराचा झटका आलेला नव्हता. बँकेत पैसे अडकल्याने कुलदीप सतत तणावात असल्याने घडल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. कुलदीप कौर विग व वॅरिंदर सिंग विग यांना तीन मुले आहेत. यापैकी एक मुलगी अमेरिकेला असते तर दुसरी मुलगी पतीचे निधन झाल्याने विग कुटुंबियांसोबत राहत होते. आपल्या मुलीच्या भविष्यासाठी विग कुटुंबीयांनी १५ लाखाची एफडी उघडली होती. तर उर्वरित बचत खात्यामध्ये देखील जवळ जवळ ३ लाखापेक्षा जास्त पैसे अडकले आहेत. कुलदीप यांचे पती वरिंदर सिंग विग हे जीटीबी नगरला गुरु तेग बहादूर हायस्कुलमध्ये नोकरी करतात तर मुलगा सुखबीर रिअरस्टेटमध्ये कार्यरत आहे. बॅँकेत मोठ्या संख्येने पैसे अडकल्याने विग कुटुंबीयांनी यावर्षी दिवाळी देखील साजरी केली नाही.
मुलाच्या वाढदिवसाच्या दिवशीच हि घटना घडल्याने मुलगा सुकबीर मानसिक धक्क्यात आहेत.शुक्रवारी कुलदीप कौर विग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरी, मुलगी अमेरिकेतून परताना दोन दिवसाला काळावधी लोटल्यावर दोन दिवसांनंतर कुलदीप कौर विग यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.