पीएमसी बँक घोटाळ्याचा पनवेल पालिकेला फटका; शेकडो कर्मचाऱ्यांच्या वेतनावर परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 05:10 AM2019-10-12T05:10:56+5:302019-10-12T05:11:12+5:30
पीएमसी बँकेतील विविध शाखांमध्ये लाखो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत.
पनवेल : पनवेल महापालिकेच्या मालकीचे सुमारे सात कोटी ६७ लाख रुपये पंजाब अॅण्ड महाराष्ट्र बँकेत अडकल्याची माहिती समोर आली आहे. २०१८ मध्ये आॅगस्ट महिन्यात ही रक्कम पालिकेने पंजाब अॅण्ड महाराष्ट्र (पीएमसी) या शेड्युल्ड बँकेत ठेवली होती. मात्र, आरबीआयच्या निर्बंधानंतर पीएमसी बॅँकेचे व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा फटका पनवेल महापालिकेलाही बसणार आहे.
पीएमसी बँकेतील विविध शाखांमध्ये लाखो ग्राहकांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. बँकेतील घोटाळा उघडकीस येताच ग्राहकांकडून निदर्शने केली जात आहेत. आरबीआयने केवळ २५ हजार रुपये काढण्याची मुभा खातेदारांना दिल्याने या रकमेत वाढ करण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे. अनेक खासगी संस्था, मोठमोठ्या सोसायटी आदीचे पैसे पीएमसी बँकेत अडकल्याचे पाहावयास मिळत असताना पनवेल महापालिकेचेही तब्बल सात कोटी ६७ लाख रुपये बँकेत अडकल्याने सर्वसामान्य खातेदारांप्रमाणे पनवेल महापालिका प्रशासनालाही आरबीआय मार्फ त पीएमसी बॅँकेवरील निर्बंध हटविण्याची वाट बघावी लागणार आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या सात कोटी ६७ लाखांच्या रकमेत जवळपास ७५० कर्मचाऱ्यांचे जवळपास दोन महिन्यांचे वेतन अडकले आहे. मात्र, संबंधित रक्कम पीएमसी बँकेत अडकली तरीसुद्धा कर्मचाºयांच्या वेतनावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे पनवेल महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांनी सांगितले.
महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार, शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्याची तरतूद करण्यात आली आहे. या शेड्युल्ड बँकेमध्ये, आरबीआयच्या कायद्यानुसार १९३४ च्या शेड्युल्ड दोनमध्ये नमूद असलेल्या बँकांचा समावेश आहे. बँकाच्या यादीमध्ये पीएमसी बँकेचाही समावेश असल्याने पालिकेने पीएमसी बँकेत उघडलेले खाते पूर्णपणे कायदेशीर असल्याची प्रतिक्रिया महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी मनोजकुमार शेटे यांनी दिली.
महाराष्ट्र महापालिका अधिनियम काय सांगते?
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार, पालिकेला शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्याचे पूर्णपणे अधिकार आहेत. शेड्युल्ड बँकेवरही आरबीआयचे नियंत्रण असते. शेड्युल्ड बॅँकांच्या यादीत एचडीएफसी,अॅक्सेस, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, आयडीबीआय बँक व पंजाब अॅण्ड महाराष्टÑ बँक (पीएमसी) आदीचा समावेश आहे. यापैकी कोणत्याही शेड्युल्ड बँकेत खाते उघडण्याची तरतूद पनवेल महापालिकेला आहे. मात्र, पीएमसी बँकेची सेवा इतर बँकाच्या तुलनेत चांगली असल्याने ही बँक निवडण्यात आल्याची माहिती शेटे यांनी दिली.