स्केचमुळे उलगडला पोक्सोचा गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Updated: March 6, 2025 11:06 IST2025-03-06T11:05:49+5:302025-03-06T11:06:43+5:30
कोणताही ठोस पुरावा नसताना दीड महिन्यानी केवळ स्केचमुळे हा गुन्हा उलगडला आहे.

स्केचमुळे उलगडला पोक्सोचा गुन्हा
सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : वाशी रेल्वेस्थानक परिसरात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अखेर अटक झाली आहे. मुलीने केलेल्या वर्णनावरून दोन संशयितांचे स्केच तयार केले होते. यावरून संशयितांची पडताळणी सुरू असताना त्या वर्णनाचा एकजण अगोदरच कोठडीत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यामुळे मुलीमार्फत त्याची ओळख परेड केली असता त्याने अत्याचार केल्याचे उघड झाले. कोणताही ठोस पुरावा नसताना दीड महिन्यानी केवळ स्केचमुळे हा गुन्हा उलगडला आहे.
२६ जानेवारीच्या दुपारी घणसोली स्थानकात १२ वर्षीय मुलगी रेल्वे पोलिसांना आढळली होती. परंतु, ती दिव्यांग असल्याने तिला स्पष्ट काही सांगता येत नसल्याने केलेल्या वैद्यकीय चाचणीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे उघड आले. रेल्वे पोलिसांनी अनेक प्रयत्न केल्यानंतर घटनास्थळ समोर आले. मुंब्रा परिसरात राहणारी ही मुलगी जत्रेदरम्यान हरवली होती. घटनेच्या १९ दिवसांनी ती वाशी रेल्वे पोलिसांना मिळून आली. तर अत्याचार झालेले ठिकाण वाशी रेल्वेस्थानकालगत खारफुटीत असल्याचे हा गुन्हा वाशी पोलिसांकडे वर्ग झाला होता.
पीडित मुलगी अर्ध दिव्यांग असल्याने तिला सर्वकाही स्पष्ट सांगता येत नव्हते, घटनास्थळ खारफुटीत असल्याने व दीड ते दोन महिने होऊन गेल्याने कोणताही ठोस पुरावाही नव्हता. यानंतरही सहायक निरीक्षक योगेश भोसले यांच्या पथकाने पीडित मुलीने केलेल्या वर्णनावरून दोन संशयितांचे स्केच तयार केले होते. ते सर्व पोलिस ठाण्यांना पाठवले असता, कोपरखैरणे पोलिसांनी अटक केलेल्या एकाची चेहरेपट्टीसारखी असून तो वाशी पोलिसांच्याच कोठडीत असल्याचे समोर आले. यामुळे पथकाने पीडित मुलीसमोर त्याला उभे केले असता मुलीनेही त्याला ओळखले आणि गुन्हा उघड झाला.
पीडितेने पहिल्याच प्रयत्नात ओळखले
अत्याचार करणारा मुकेश खगेंद्र नेपाळी (२०) वर्षभरापूर्वी भारतात आला होता. बेघर, बेरोजगार असल्याने तो उघड्यावरच राहायचा. त्याची वाशी स्थानकात पीडितेवर नजर पडली असता, तृतीयपंथींच्या मदतीने तिला खारफुटीत नेवून अत्याचार केला होता.
त्याने कोपरखैरणे परिसरात एका अल्पवयीन मुलीची छेड काढली होती. याप्रकरणी त्याला अटक करत वाशी पोलिस ठाण्याच्याच कोठडीत ठेवले होते. स्केचमुळे त्याची ओळख पटली. सलीम, समीर अशी नावे वापरून तो वावरत होता. परंतु, पीडितेने पहिल्याच प्रयत्नात त्याला ओळखले.