पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2022 06:32 AM2022-10-02T06:32:50+5:302022-10-02T06:33:20+5:30

मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले.

podi school in panvel gets first 5G service in the presence of cm eknath shinde | पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती 

पनवेलमधील पोदी शाळेला ‘५ जी’ सेवेचा पहिला मान; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती 

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल: भारतात ५ जी सेवेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात पनवेल पालिकेच्या पोदी येथील सावित्रीबाई फुले शाळेला याचा पहिला मान मिळाला आहे. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रिलायन्स जिओ आणि एअरटेल हाय स्पीड ५ जी सेवेला सुरुवात झाली.

दिल्लीहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रगती मैदानावर ५ जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये केला. येथूनच पंतप्रधान मोदी यांनी देशभरात ५ जी सेवेशी जोडलेल्या ३० शाळांसोबत एकत्रित संवाद साधला. महाराष्ट्रात पनवेलमधील पोदी शाळेत सकाळी दहा वाजता उपस्थित राहून मुख्यमंत्री शिंदे ऑनलाईन पंतप्रधानांशी जोडले गेले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत खुर्चीऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले.

विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी ५ जीचे महत्त्व सांगितले. क्रांतिकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅँकिंग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे म्हटले. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून, विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा. गेम आणि चित्रपट डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच पंतप्रधानांचेही आभार मानले. या नवीन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलीस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाईव्ह जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल, अशी माहिती दिली. पोदी शाळेत कार्यक्रम होणार असल्याने शाळेला नवी झळाळी देण्यात आली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

व्हर्च्युअल क्लासरूमसाठी विद्यार्थ्यांची निवड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा प्रारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरूमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठमधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: podi school in panvel gets first 5G service in the presence of cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.