पनवेलच्या महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल यांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 01:19 AM2020-01-08T01:19:23+5:302020-01-08T01:19:31+5:30
पनवेल महापालिकेच्या महापौरपदी इच्छुकांना डावलून पुन्हा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे.
पनवेल : पनवेल महापालिकेच्या महापौरपदी इच्छुकांना डावलून पुन्हा महापौर डॉ. कविता चौतमोल यांना भाजपतर्फे संधी देण्यात आली आहे. मंगळवारी महापौरपदासाठी कविता चौतमोल आणि उपमहापौरपदासाठी जगदीश गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. १० जानेवारी रोजी होणाऱ्या विशेष सभेत अधिकृतरीत्या महापौर व उपमहापौरपदाची निवड करण्यात येणार आहे.
शेकापतर्फेही औपचारिकता म्हणून महापौरपदासाठी प्रिया भोईर आणि उपमहापौरपदासाठी डॉ. सुरेखा मोहोकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपचे संख्याबळ पाहता, भाजपतर्फे दोन्ही उमेदवार सहज निवडून येणार हे जवळपास निश्चित आहे.
महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षे महिला खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकांना संधी चालून आली होती. खारघर भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा व माजी महिला बाल कल्याण सभापती लीना अर्जुन गरड तसेच संजना समीर कदम यांची नावे महापौरपदासाठी आघाडीवर होती.
दोन्ही नगरसेविकांनी तशी इच्छा पक्षनेतृत्वाकडे बोलून दाखवली होती. मात्र, पुन्हा एकदा चौतमोल यांना संधी दिल्याने इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली आहे. लीना गरड यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
महापौरपदासाठी खुल्या प्रवर्गातील महिला नगरसेविकेला महापौरपदी विराजमान होण्याची संधी आरक्षणामुळे चालून आली होती. माझ्यासह या प्रवर्गातील इतर महिला सदस्यांना महापौरपदाच्या निवडीत डावलल्याची खंत व्यक्त करीत महापौर निवडीबाबत गरड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पक्षश्रेष्ठी याची दखल घेतील, अशी आशा गरड त्यांनी व्यक्त केली.
>पनवेल महापालिकेतील पक्षीय बलाबल
पनवेल महापालिकेतील ७८ नगरसेवकांपैकी ५१ नगरसेवक भाजपचे आहेत. शेकापच्या वतीने महापौरपदासाठी उमेदवार अर्ज दाखल केला असला तरी पक्षीय बलाबल पाहता भाजपच्या डॉ. कविता चौतमोल महापौर तर
जगदीश गायकवाड उपमहापौरपदावर निवडून येणार असल्याचे निश्चित आहे.