पनवेल : पनवेलच्या महापौरपदी डॉ. कविता चौतमोल, तर उपमहापौरपदी जगदीश गायकवाड यांची शुक्रवारी झालेल्या विशेष सभेत अधिकृतपणे निवड करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हाधिकारचे मिलिंद बोरीकर यांनी या वेळी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.महापौरपदासाठी भाजपतर्फे डॉ. कविता चौतमोल तर शेकाप आघाडीच्या वतीने प्रिया भोईर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर उपमहापौरपदासाठी भाजपतर्फे जगदीश गायकवाड तर शेकाप आघाडीच्या वतीने डॉ. सुरेखा मोहोकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मतदानापूर्वी निवडणूक अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची संधी दोन्ही उमेदवारांना दिली. या वेळी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने दोन्ही निवडणुकीत मतदान झाले. या वेळी भाजप उमेदवारांना ४९ तर शेकाप आघाडीच्या उमेदवाराला २७ मते मिळाली. निवडणूक अधिकारी बोरीकर यांनी डॉ. कविता चौतमोल यांना महापौर व उपमहापौर म्हणून जगदीश गायकवाड यांना घोषित केले. उपमहापौरपदी विराजमान झालेल्या जगदीश गायकवाड यांनी शहरात मिरवणूक काढली होती. डॉ. कविता चौतमोल यांची ही दुसरी टर्म असल्याने महापौरापेक्षा उपमहापौर यांच्या स्वागतासाठी त्यांच्या समर्थकांनी फडके नाट्यगृहाबाहेर गर्दी केली होती.
पनवेल महापौरपदी पुन्हा कविता चौतमोल विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:13 AM