पाऊस कवितांनी रंगले कवी संमेलन
By admin | Published: June 25, 2017 04:15 AM2017-06-25T04:15:14+5:302017-06-25T04:15:14+5:30
‘नव्या नकली जमान्यात पाऊस तेवढा खरा आहे... विनाशाच्या वाळवंटात तोच जीवन झरा आहे...ये म्हणता येत नाही, नको म्हणता जात नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ‘नव्या नकली जमान्यात पाऊस तेवढा खरा आहे... विनाशाच्या वाळवंटात तोच जीवन झरा आहे...ये म्हणता येत नाही, नको म्हणता जात नाही मनमनमोकळा बरसण्याची त्याची तेवढी तऱ्हा आहे... पाऊस तेवढा खरा आहे’ कवी साहेबराव ठाणगे यांनी सादर केलेल्या कवितेने ‘लोकमत’च्या वतीने आयोजित कविसंमेलनात रंगत आणली.
महाकवी कालीदास दिनानिमित्त सानपाडा येथील बोंगीरवार भवन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभागी शहरातील प्रसिद्ध कवींनी प्रत्येकाच्या मनातील पाऊस कसा असतो? याचे चित्र कवितेच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केला. कवितांच्या मैफिलीमध्ये पावसावर आधारित कवितांबरोबरच गझल, शायरी, प्रेमकविता यांचाही समावेश होता.
कार्यक्रमाला कवी साहेबराव ठाणगे, दुर्गेश सोनार, महेंद्र कोंडे, राधिका फराटे, जितेंद्र लाड, विश्वास ठाकूर, मोहन भोईर यांची प्रमुख उपस्थिती होती. कवितेच्या माध्यमातून शेतकऱ्याची व्यथा, आईबापाचे लेकाशी असलेले नाते, प्रियकर आणि प्रेयसीमधील नातेही कवितेच्या माध्यमातून विस्तृत करण्यात आले. कवी साहेबराव ठाणगे यांनी पाऊस पाऊस पाणी, सैरभैर, मनातल्या मनात या पुस्तकांमधील कविता या ठिकाणी सादर केल्या. एका मराठी दूरचित्रवाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या दुर्गेश सोनार यांनी पावसावर आधारित कविता सादर केल्या. कवी महेंद्र कोंडे यांनी सादर केलेल्या ‘बाप’ या कवितेने प्रेक्षकवर्ग भारावून गेला. तर जितेंद्र लाड यांनी ‘आई’साठी सादर केलेल्या कवितेने प्रत्येकाला आपल्या आईची आठवण करून देणारी ठरली. राधिका फराटे यांनी सादर केलेली गझल आणि शायरींना प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली. दोन तास चाललेल्या कवितांच्या या मैफिलीला प्रेक्षकांनी टाळ््यांच्या कडकडाटीसह उत्तम प्रतिसाद दिला.
हा मोसम पावसाचा
एकांतात मुसळतो
पैंजणाच्या नादात रात्रंदिस कोसळतो
या गुलाबी पावसातही बोलतेस
पाऊस म्हणजे हिरवं पान, पाऊस म्हणजे जीवनगान....
अशी पाऊस कविता कवी जितेंद्र लाड यांनी सादर केली.
‘तर पापणीचा पाऊस रात्रंदिस गळतो आणि साहेबाच्या हाफिसात सातबारा जळतो’ या कवितेच्या ओळीतून शेतकऱ्याची व्यथा लाड यांनी मांडली.
‘खांद्यावर घ्यायचा, उंचावर न्यायचा
दुुनिया कशी दिसते दाखवितो म्हणायचा,
त्याच्या खांद्यावरून बघता, उंच दुनिया खुजी व्हायची
वर मान करून बघायला लागायचे, ती माणसे बुटकी दिसायची,
जाम धमाल यायची मग, वरून खाली बघताना
चिंगी-टिंगी-सनी-मनी, यांना वाकुल्या दाखवताना...’
अशी ही ‘बाप’ कविता कवी महेंद्र कोंडे यांनी सादर केली
‘हजाराच्या तुझ्या नोटा कधीच बंदही झाल्या,
मला चिल्लर समजला तू तरी चलनात आहे मी...’
अशा कवियित्री राधिका फराटे यांनी सादर केलेल्या गझल आणि कवितांना चांगलीच वाहवा मिळाली.