मुंबई - आरे कॉलनी येथील युनिट क्रमांक ३२मधील आंब्याच्या झाडाच्या खोडावर खोल छिद्र पाडून त्यात अॅसिडसदृश विषारी द्रव्याचा वापर करत झाड मारण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आरे कॉलनीतील अधिकारी व स्थानिकांनी तक्रार दिल्याने या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रकाश बेले यांनी दिली.आरे कॉलनी येथील युनिट क्रमांक ३२ शासकीय पर्यवेक्षकीय निवासस्थान क्रमांक २च्या समोरील अंगणात अंदाजे १० ते १२ फूट अंतरावर आंब्याचे झाड आहे. या झाडाचा खोडाचा परीघ साधारणपणे सहा ते सात फूट व ३० ते ३५ फूट उंची असलेल्या आंब्याच्या झाडाला टोकदार वस्तूच्या साहाय्याने तीन ते चार इंच खोल २० छिद्रे पाडण्यात आली. या खोल छिद्रांमध्ये विषारी द्रव्याचा वापर करण्यात आल्यामुळे झाडांची पाने सुकल्याचे दिसून आल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर स्थानिक नीलेश धुरी यांनी सांगितले की, झाडांच्या खोडाला छिद्रे करून त्यात विषारी रसायन टाकून झाडांना व्यावसायिकांच्या स्वार्थासाठी मारण्यात येत आहे. आरे कॉलनीतील सतत मोठमोठ्या झाडांवर कुºहाड पडत आहे. येथील झाडांना धोका असून, पर्यावरणाचा समतोल बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जानेवारी २०१८मध्ये आरे कॉलनीत युनिट क्रमांक १३मधील पिंपळ आणि जांभळाच्या खोडांवर छिद्रे पाडून विषारी द्रव्याचा वापर करत झाडांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
आरेतील झाडावर पुन्हा विषप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 6:57 AM