पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन तोतया पोलिसांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2019 11:19 PM2019-08-19T23:19:48+5:302019-08-19T23:20:15+5:30
नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संगणक व्यावसायिकाला धमकावून लुटणा-या दोन तोतया पोलिसांना गुन्हे शाखा पथकाने अटक केली. खारघरमधील घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
नवी मुंबई : नेरुळ रेल्वे स्टेशनसमोर संगणक व्यावसायिकाला धमकावून लुटणा-या दोन तोतया पोलिसांना गुन्हे शाखा पथकाने अटक केली. खारघरमधील घरफोडीच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
शुभम सुभाष पाटील व विशाल मोरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी १२ आॅगस्टला रात्री साडेनऊ वाजता नेरुळ रेल्वे स्टेशनबाहेर संगणक व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखविला होता. व्यावसायिकाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर त्याला मारहाण करून त्याच्याकडील ८६ हजार रुपये रोख रक्कम घेवून तेथून पलायन केले. याप्रकरणी नेरुळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. पोलीस असल्याचे सांगून लुटल्यामुळे आयुक्त संजय कुमार यांनी स्थानिक पोलीस स्टेशनसह गुन्हे शाखेलाही तपासाच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी शुभम व विशालला अटक केली असून २१ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
चौकशीत, ७ मार्च २०१९ रोजी खारघरमधील संगणक दुकानामधील चोरीमध्येही त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुकानामधून अडीच लाखांची चोरी झाली होती. गुन्ह्याचा उलगडा करण्यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर, सहायक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल, नीलेश तांबे, राणी काळे, संजय पवार, पोपट पावरा, सतीश सरफरे, ज्ञानेश्वर बनकर, प्रदीप कदम, विष्णू पवार, मिथुन भोसले, दिलीप भास्करे, युवराज जाधव, सागर हिवाळे, सतीश चव्हाण, ऊर्मिला पवार, मेघनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.