भररस्त्यात पोलिसांची सोनसाखळी चोरांसोबत झटापट, ऐरोलीतली घटना
By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 17, 2023 19:38 IST2023-05-17T19:38:02+5:302023-05-17T19:38:08+5:30
एकाला अटक, दुसरा पळाला

भररस्त्यात पोलिसांची सोनसाखळी चोरांसोबत झटापट, ऐरोलीतली घटना
नवी मुंबई :सोनसाखळी चोरी करून पळणाऱ्या एकाला रबाळे पोलिसांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून अटक केली आहे. त्याचा दुसरा साथीदार पळून गेला असून दोघेही आंबिवलीचे आहेत. पोलिस पाठलाग करून असताना त्यांनी पोलिसांवर हल्ल्याचा देखील प्रयत्न केला.
सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असून त्याला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. याच उद्देशाने रबाळे पोलिसांकडून रविवारी रात्री ऐरोली सेक्टर ८ परिसरात साध्या गणवेशात गस्त घातली जात होती. यादरम्यान राज तवटे (२१) याची चैन चोरून दोघेजण पळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यामुळे उपनिरीक्षक दयानंद वणवे, उपनिरीक्षक चंद्रकांत लांडगे, पोलीस नाईक विजय कारंकाळ व राजेंद्र जाधव यांनी दोन मोटारसायकलवरून त्यांचा पाठलाग सुरु केला. दिवा येथे सिग्नल लागल्याने वाहतूक कोंडी होऊन चोरट्यांनी मोटरसायकल त्यात अडकली होती. यामुळे पोलिसांनी धावत जाऊन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांची मोटरसायकल अडवून त्यांना पकडले जात असताना पाठीमागे बसलेल्या गुन्हेगाराकडून त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न होत होता.
त्यामध्ये त्याने चाकू देखील पोलिसांच्या दिशेने भिरकावला. अखेर काही वेळ चाललेल्या झटापटीमद्ये मुसा सय्यद (२९) हा पोलिसांच्या हाती लागला. तर त्याचा साथीदार हसन अयुब सय्यद इराणी (२२) हा चोरलेली चैन घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली असून ती उल्हासनगर येथून चोरलेली आहे. त्यामुळे हाती लागलेल्या मुसा याच्याकडून सोनसाखळी चोरीसह वाहनचोरीचे देखील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्याच्यावर रबाळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.