नवी मुंबई : दुचाकी चोरणाºया सराईत टोळीला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी एकजण अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. तिघेही राईडची मजा घेण्यासाठी मोटरसायकल चोरल्यानंतर निर्मनुष्य ठिकाणी सोडून द्यायचे. नुरुलहक जैनुलाबद्दीन लब्बाई (१९) व आफाक मुस्तफा शेख (१९)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.लॉकडाऊनच्या काळात शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामध्ये स्थानिक टोळ्या सक्रिय असल्याची शक्यता होती. तर चोरीला गेलेल्या बहुतांश दुचाकीमध्ये सुपर बाईकचा देखील समावेश होता. त्यावरून या टोळीच्या मुसक्या आवळण्याचा गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी तपास पथके तयार केली होती. त्याद्वारे नेरुळ परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यापैकी एकजण अल्पवयीन असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील तिघांना गुन्हे शाखा पोलिसांनीच वाहनचोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. परंतु अल्पवयीन असल्याने त्यांना अटक होऊ शकली नव्हती. या तिघांकडून सात गुन्ह्यांची उकल झाली आहे. तिघेही चांगल्या कुटुंबातले असून केवळ मोटारसायकलच्या छंदामुळे गुन्हेगारी मार्गाला लागले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक; गुन्हे शाखेची कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 2:29 AM