नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याचे घर लुटणाऱ्या नोकराला युपीमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2018 08:10 PM2018-04-07T20:10:50+5:302018-04-07T20:10:50+5:30

तो गेल्या एक वर्षापासून शिवसेना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्याकडे नोकरी करत होता.

Police arrested servant looted opposition leader house in Navi Mumbai | नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याचे घर लुटणाऱ्या नोकराला युपीमधून अटक

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्याचे घर लुटणाऱ्या नोकराला युपीमधून अटक

Next

नवी मुंबई : शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्या घरी चोरी करणाऱ्या घरगडय़ाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. 31 मार्चला त्याच्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन घरांपैकी एका घराची चावी मिळवून त्याने घरात कोणी नसताना चोरी करून पळ काढला होता. त्याने चोरलेल्या ऐवजापैकी 870 ग्रॅम सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

अनुराग सिंग (20), असे चोरी प्रकरणी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो गेल्या एक वर्षापासून शिवसेना विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्याकडे नोकरी करत होता. यादरम्यान तो चौगुले यांचा सर्वाधिक विश्वासू कामगार म्हणून सर्वाना परिचित होता. 30 मार्चच्या रात्री त्याने ऐरोली येथील यश पॅराडाईज इमारतीमधील चौगुले यांच्या एका घरातून दुस:या घराची चावी मिळवून त्या घरात प्रवेश केला. या वेळी चौगुले यांच्या कुटुंबातील व्यक्ती काही कामानिमित्ताने घराबाहेर गेलेल्या होत्या. 31 मार्चला सकाळी घरातील व्यक्ती परत आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. यानुसार त्याच्याविरोधात रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याने रोख रक्कम व सोन्याचे दागिने, असा सुमारे 25 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार चौगुलेंच्या कुटुंबीयांनी केली होती. त्यानुसार उपआयुक्त सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय कुंभार व पोलीस नाईक प्रकाश साळुंखे यांचे तपास पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी काही दिवसांतच सिंग याच्या उत्तरप्रदेशातील मूळ गावातील वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती मिळवली होती; परंतु त्या ठिकाणी रबाळे पोलिसांचे पथक पोहोचल्याची चाहूल लागताच त्याने पळ काढला होता. यानंतर पुन्हा पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या आधारे त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्या नव्या ठिकाणाचा शोध घेऊन अटक केली. अटकेनंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे वरिष्ठ निरीक्षक तिदार यांनी सांगितले. तर त्याने चोरलेल्या मुद्देमालापैकी 870 ग्रॅम सोन्याचे दागिने व दीड लाखाची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

Web Title: Police arrested servant looted opposition leader house in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.