बनावट "छाप्यातून" व्यावसायिकाचा काढला "काटा" ;२ कोटीची लूट प्रकरण

By सूर्यकांत वाघमारे | Published: April 1, 2024 08:15 PM2024-04-01T20:15:59+5:302024-04-01T20:16:06+5:30

घाटकोपर येथील व्यवसायिकासोबत २९ मार्चला वाशीत हा प्रकार घडला होता. ते तुर्भे एमआयडीसी मधील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जात असताना अज्ञातांनी वाशीत त्यांची कार अडवली होती.

Police arrested six people including a police inspector who robbed a businessman of Rs 2 crore by threatening action | बनावट "छाप्यातून" व्यावसायिकाचा काढला "काटा" ;२ कोटीची लूट प्रकरण

बनावट "छाप्यातून" व्यावसायिकाचा काढला "काटा" ;२ कोटीची लूट प्रकरण

नवी मुंबई : व्यावसायिकाला कारवाईचा धाक दाखवून २ कोटी रुपये लुटणाऱ्या पोलिस निरीक्षकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी व्यावसायिकाची कार अडवून छापा असल्याचे भासवून अपसंपदा प्रकरणात कारवाईची भीती दाखवून २ कोटी रुपये उकळले होते. याप्रकरणी तक्रारीनंतर वाशी पोलिस व गुन्हे शाखा पोलिस यांनी गतीने तपासाची सूत्रे हलवून संबंधितांना अटक केली आहे. व्यावसायिकाकडे चालकाचे काम करणाऱ्या व्यक्तीने त्याला कामावरुन काढल्याचा बदला घेण्यासाठी साथीदारांसह हा लुटीचा कट रचला होता.

घाटकोपर येथील व्यवसायिकासोबत २९ मार्चला वाशीत हा प्रकार घडला होता. ते तुर्भे एमआयडीसी मधील त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी जात असताना अज्ञातांनी वाशीत त्यांची कार अडवली होती. त्यांनी आपण पोलिस असल्याचे सांगून त्यांच्यावर छापा पडला असल्याचे सांगितले होते. तुमच्याकडे अपसंपदा असून त्यामध्ये कुटुंबियांना देखील अडकवून कारवाईची धमकी त्यांनी दिली होती. हि कारवाई टाळण्यासाठी १५ कोटींची मागणी करत २ कोटीवर तडजोड करून तेवढी रोकड घेऊन त्यांनी पोबारा केला होता. यावेळी गाडीत बसून असलेली एक व्यक्ती पोलिसांच्या गणवेशात होती अशी माहिती तक्रारदाराने दिली होती.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाशी पोलिस व गुन्हे शाखेची विविध पथके तपास करत होती. त्यामध्ये व्यापाऱ्याच्या घरापासून पाठलाग करणाऱ्या कारची माहिती मिळाली होती. त्याद्वारे शनिवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटे पर्यंत पोलिसांनी जलदगतीने तपास करून सहा जणांना अटक केली. त्यामध्ये ठाणे पोलिस दलातील सुरक्षा शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन विजयकर (५५) यांच्यासह मोहन पाडळे, उदय कवळे, विलास मोहिते, नारायण सावंत व मोहन पवार यांचा समावेश आहे. मोहिते हा सदर व्यापाऱ्याकडे चालकाचे काम करायचा. मात्र त्याला कामावरून काढल्याने त्याने व्यापाऱ्याच्या संपत्तीची माहिती इतर साथीदारांना देऊन कारवाईचा धाक दाखवून मोठी रक्कम उकलण्याचा कट रचला होता. त्यानुसार व्हीजलन्स विभागाचा छापा असल्याचे भासवून व्यापाऱ्याला धमकावून त्यांनी २ कोटी रुपये उकळले होते.

तपास पथकांनी रात्र जागवली

लुटीचा गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे निरीक्षक सुनील शिंदे, कक्ष एकचे निरीक्षक आबासाहेब पाटील, कक्ष तीनचे निरीक्षक हनीफ मुलानी, वाशी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय नाळे आदींनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपासावर जोर दिला होता. त्यामद्ये पोलिसांनी शनिवारी रात्रीपासून ते सोमवारी पहाटेपर्यंत अथक प्रयत्न करून सहा जणांना अटक केली. 

Web Title: Police arrested six people including a police inspector who robbed a businessman of Rs 2 crore by threatening action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.