देशमुख टोळीचे पोलिसांनी मोडले कंबरडे, पाचव्यांदा लागणार मोक्का
By सूर्यकांत वाघमारे | Published: October 10, 2022 08:41 PM2022-10-10T20:41:43+5:302022-10-10T20:42:04+5:30
नवी मुंबईत गुन्हेगारी दहशत पसरवून पाहणाऱ्या विकी देशमुख याच्या टोळीवर पाचवा मोक्का लावण्याच्या प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे.
नवी मुंबईतगुन्हेगारी दहशत पसरवून पाहणाऱ्या विकी देशमुख याच्या टोळीवर पाचवा मोक्का लावण्याच्या प्रक्रिया पोलिसांनी सुरु केली आहे. त्याच्यावर हत्या, खंडणी, बलात्कार असे गंभीर स्वरूपाचे ३८ गुन्हे समोर आले आहेत. तर हत्या करून पुरावे नष्ट करण्यात त्याची टोळी माहीर असल्याने त्यांच्यावर कायद्याचा धाक राहिला नव्हता. मात्र देशमुख याला गोव्यातून अटक केल्यानंतर एक महिन्याच्या तपासात त्याच्या कृत्यांचा संपूर्ण लेखा जोखा पोलिसांनी काढला असून अकरा जणांना अटक देखील केली आहे.
पनवेल परिसरात दहशत असलेला गुंड विकी देशमुख हळू हळू संपूर्ण नवी मुंबईत त्याच्या टोळीची दहशत वाढवत चालला होता. व्यावसायिकांचे अपहरण करून खंडणी उकळणे, पैसे न दिल्यास हत्या करणे, पिस्तूलच्या धाकावर धमकावणे असे अनेक गुन्हे त्याच्या टोळीवर आहेत. यापूर्वी त्याच्यावर तीनदा मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र २०१९ पासून तो नवी मुंबई पोलिसांना चकमा देत नवी मुंबई व ठाणे परिसरात लपून राहत होता. अखेर दिड महिन्यांपूर्वी त्याला गोव्या मधून अटक करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले होते. तत्पूर्वी सचिन गर्जे याच्या हत्ये प्रकरणी त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केलेली आहे. या गुन्ह्यात देखील देशमुख याच्यासह त्याच्या टोळीवर मोक्का लावण्यात आला होता. देशमुख याचाच साथीदार फुटण्याच्या मार्गावर असल्याने अपहरण करून त्याची हत्या करून मृतदेहाची तीनदा विल्हेवाट लावण्याचा प्रकार केला होता.
त्यानंतर मागील एक वर्षांपासून उलवेतले व्यावसायिक अशोक घरत यांचे अपहरण करून देशमुख टोळीने त्यांचीही हत्या केल्याचे समोर आले आहे. दोन्ही हत्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागणार नाही याची खबरदारी टोळीकडून घेण्यात आली होती. मात्र विकी देशमुख यालाच अटक केल्यानंतर त्याच्या संपूर्ण कृत्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. त्याद्वारे अकरा जणांना अटक करण्यात आली असून त्यात त्याच्या गुन्ह्यातले साथीदार व नातेवाईकांचा समावेश आहे. सर्वांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून काहीजण देशमुख याच्या पाश्च्यात खंडणी जमा करण्याचे काम करायचे. तर पनवेल येथील खदान व्यावसायिकाचे अपहरण करून ८० लाख उकळल्याचे देखील समोर आल्याने या गुन्ह्यात त्यांच्यावर पाचवा मोक्का लावला जाणार आहे. तर देशमुख टोळीच्या मुसक्या आवळल्याने संघटित गुन्हेगारी करणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण होऊन गुन्हेगारी घटेल असा विश्वास पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. याप्रसंगी अपर आयुक्त महेश घुर्ये, उपायुक्त सुरेश मेंगडे आदी उपस्थित होते.
टोळी मोडीत निघणार?
विकी देशमुख व त्याच्या टोळीवर हत्या, खंडणी, शस्त बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. शिवाय विकी व त्याचा भावावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात पॉक्सोचा गुन्हा दाखल आहे. हि गुन्हेगारी पाहता त्यांना जामीन मिळण्यात कायदेशीर अडचणी येऊन त्यांना अधिकाधिक शिक्षा मिळेल असा पोलिसांचा विश्वास आहे.
तेलंगणा मधून दोघांना अटक
विकीचे साथीदार परशा मोकल, जितेंद्र देशमुख दोघांना तेलंगणा मधून अटक केल्यानंतर त्यांनी काही गुन्ह्यांची कबुली दिली. त्याद्वारे विकीचा दाजी धनेश थोरात व त्याचे पुणेतले साथीदार विजय काळे, गोपाळ इंगळे यांना पोलिसांनी अटक केली. तर गुन्हा केल्यानंतर देशमुखला लपण्यासाठी आश्रय देणारी त्याची मावशी व काका यांच्यासह एकूण ११ जणांना महिन्याभरात पोलिसांनी अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरु आहे. तर तीन दिवसांपूर्वी न्हावा शेवा मधून शस्त्र बाळगल्याप्रकरणी अटक केलेला विक्रांत भोईर हा देखील देशमुख टोळीचाच असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास
देशमुख टोळीची नांगी वेळीच ठेवण्यासाठी उपायुक्त सुरेश मेंगडे, सहायक आयुक्त विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह भोसले, गिरीधर गोरे, शत्रुघ्न माळी, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, उत्तम घेगडमल, सहायक निरीक्षक निलेश पाटील, इशांत खराटे आदींच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करून देशमुख टोळी विरोधातला कारवाईचा फास आवळला आहे.