कळंबोली : रोडपाली येथील क्रीडांगणाकरिता राखीव असलेल्या भूखंडावर पावसामुळे मोठ्या प्रमाणात गवत आणि झाडी वाढली होती. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत होता. नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील प्रशिक्षणार्थी पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून येथे श्रमदान सुरू केले आहे.एकूण १३३ जण या भूखंडावर घाम गाळत आहेत. पोलिसांच्या या उपक्रमाचे रोडपालीवासीयांनी कौतुक केले आहे.नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या समोर त्याचबरोबर नीलकंठ टॉवरच्या बाजूला सेक्टर १७ येथे क्रीडांगणाकरिता एक दहा एकराचा भूखंड राखीव आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचून मोठ्या प्रमाणात डास निर्माण होत होते. उन्हाळ्यात सिडकोने या भूखंडावरील खोलगट भागात माती टाकून सपाटीकरण केले. त्यामुळे येथील रहिवासी त्याचबरोबर मुले या जागेचा क्रीडांगण म्हणून वापर करू लागले. परंतु पावसामुळे या जागेवर झाडेझुडपे, गवत मोठ्या प्रमाणात वाढले होते. डोक्याच्या वर गवत गेल्याने एक प्रकारचे जंगलच तयार होते. त्याचा त्रास आजूबाजूच्या रहिवाशांना होत होता.याशिवाय काही फेरीवाले झाडाझुडपाचा फायदा घेत येथे कचरा टाकत होते. या व्यतिरिक्त काही प्रमाणात डेब्रिजही टाकले जात होते. परंतु सिडकोकडून याबाबत दुर्लक्ष होत होते. म्हणून नवी मुंबई पोलीस मुख्यालयाच्या वतीने या भूखंडावर बुधवारपासून श्रमदान सुरू केले आहे. ९२ पुरुष आणि ४१महिला प्रशिक्षणार्थी पोलीस हवालदार आनंद गिरी यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ ते १२ आणि सायंकाळी तीन ते पाच या कालावधीत बुधवारपासून येथील गवत काढून साफसफाई करीत आहेत.आणखी काही दिवसश्रमदान करून तो भूखंड रोडपालीकरिता स्वच्छ करून देण्याचा संकल्प पोलिसांनी केला आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर सामाजिक बांधिलकी जपणारा पोलिसांचा उपक्र म स्तुत्य असल्याचे येथील रहिवासी बी.डी. घुमे यांनी सांगितले.
सिडकोच्या भूखंडावर पोलिसांचे श्रमदान,१३३ जण घेताहेत मेहनत, नवी मुंबई पोलिसांचे कौतुक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 1:20 AM