पोलिसांनी तपासले ५०० तासांचे चित्रीकरण, चालण्याच्या लकबीवरून आरोपीची ओळख

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 03:20 AM2018-09-28T03:20:38+5:302018-09-28T03:20:51+5:30

अल्पवयीन मुलींवर बलात्काराची मालिका करत सुटलेल्या तरुणाला गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाच्या ३७६व्या दिवशी अटक केली आहे. सन २०१५ मध्ये तळोजा येथील पॉक्सोच्याच गुन्ह्यात कारवाईनंतर जामिनावर बाहेर सुटल्यापासून दीड वर्षापासून तो गुन्हे करत होता.

Police checked the 500-hour recording of the accused, the accused was arrested on the run | पोलिसांनी तपासले ५०० तासांचे चित्रीकरण, चालण्याच्या लकबीवरून आरोपीची ओळख

पोलिसांनी तपासले ५०० तासांचे चित्रीकरण, चालण्याच्या लकबीवरून आरोपीची ओळख

Next

- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई - अल्पवयीन मुलींवर बलात्काराची मालिका करत सुटलेल्या तरुणाला गुन्हे शाखा पोलिसांनी तपासाच्या ३७६व्या दिवशी अटक केली आहे. सन २०१५ मध्ये तळोजा येथील पॉक्सोच्याच गुन्ह्यात कारवाईनंतर जामिनावर बाहेर सुटल्यापासून दीड वर्षापासून तो गुन्हे करत होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांना सुमारे ५०० तासांचे सीसीटीव्ही, तसेच एक हजार फोनचा सीडीआर तपासावा लागला आहे.
मागील दीड वर्षापासून नवी मुंबईसह, ठाणे, मुंबई परिसरात अल्पवयीन मुलींवर बलात्कार व लैंगिक अत्याचार करणाऱ्या रेहान अब्दुल राशिद कुरेशी (३४) याला अखेर अटक झाली आहे. अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी मीरा रोड परिसरातून त्याला शोधून काढले आहे. दीड वर्षापूर्वी खारघर व सीबीडी परिसरात अल्पवयीन मुलींना फूस लावून बलात्काराच्या दोन घटना घडल्या होत्या. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीच्या तपासात पोलिसांपुढे दोन संशयित आरोपींचे चेहरे समोर आले होते. दरम्यानच्या काळात काही दिवस असे गुन्हे थांबल्यानंतर पुन्हा अशा प्रकारचे गुन्हे घडू लागले. मात्र त्यामध्ये दोघांऐवजी एकाच तरुणाचा समावेश दिसून आला, तर नवी मुंबईसह मुंबई व ठाणे परिसरात हे गुन्हे घडत होते. त्यामुळे अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडणाºया या गुन्हेगाराच्या शोधासाठी नवी मुंबई गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली. त्याकरिता प्रत्येक घटनास्थळ व परिसरातील तसेच नवी मुंबई, मुंबई व ठाणे येथील रेल्वेस्थानकांमधील सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवून त्यामध्ये संशयित आरोपीचा शोध घ्यायला सुरवात केली. याकरिता सुमारे ५०० तासांचे सीसीटीव्ही पोलिसांना तपासावे लागले. त्यामध्ये रबाळे, नेरुळ, सानपाडा अशा काहीच स्थानकामध्ये तो ये-जा करताना दिसून आला. काही ठिकाणी तो मोबाइल फोनवर बोलत असल्याचे सीसीटीव्हीत दिसत होते. परंतु अशा ठिकाणचे सुमारे १ हजार फोनचे सीडीआर तपासून त्यातही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. अखेर सीसीटीव्हीत दिसणारी त्याची चालण्याची पद्धत हाच ठोस पुरावा समजून तपासाला सुरवात केली. त्याकरिता गुन्हे शाखा उपआयुक्त तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. त्यांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयिताची संपूर्ण हालचाल नजरेत कैद करून घेतली. यानंतर त्यांनी हार्बर, ट्रान्सहार्बर तसेच मेन लाइनच्या रेल्वेने प्रवास करत संशयिताचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला.
दरम्यान, नालासोपारा व पालघर येथील घटनेनंतर मीरा रोड स्थानकातून त्याच्या प्रवासाची सुरवात व शेवट होत असल्याचे सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आले. त्यानुसार तीन दिवसांपासून दोन पथके सदर परिसरातील शेकडो प्रवाशांमधून रेहान कुरेशी (३४) याला रस्त्याने चालत असतानाच त्याची चाल हेरून पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन तो उघड करण्याकरिता कसोटीचे प्रयत्न सुरू होते. आरोपीचा ठोस पुरावा नसल्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातूनच त्याचा शोध सुरू होता. अखेर मीरा रोड परिसरातून त्याला अटक करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. हा खटला फास्ट ट्रॅकने चालावा यासाठी प्रयत्न करणार आहे.
- संजय कुमार,
पोलीस आयुक्त, नवी मुंबई

फास्ट ट्रॅकने खटला चालवण्याची मागणी
दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलींना वासनेचे बळी पाडणाºया गुन्हेगाराला अटक झाल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. सदर गुन्हेगाराला कठोर कारवाई व्हावी याकरिता पोलिसांनी प्रयत्न करावे व हा खटला फास्ट ट्रॅकने चालवला जावा, अशी मागणी कोपरखैरणेतील पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केली आहे.

गुन्हे करताना खबरदारी
तळोजा येथील गुन्ह्यात पकडले गेल्यानंतर यापुढे पोलिसांच्या हाती लागणार नाही याची खबरदारी तो घ्यायचा. त्याकरिता गुन्हा करण्यापूर्वी तीन तास अगोदर परिसराची रेकी करायचा. शिवाय घटनास्थळाकडे जाण्यापूर्वीच स्वत:चा मोबाइल बंद ठेवायचा. मात्र रस्त्याने चालताना फोन कानाला लावून बोलत असल्याचे नाटक करायचा. यामुळे सीडीआरच्या तपासातही त्याच्याविषयीची माहिती पोलिसांना मिळू शकली नव्हती.

गुन्ह्यातले
कपडे जप्त
गुन्ह्यावेळी त्याने वापरलेले व सीसीटीव्हीत दिसणारे त्याचे कपडे पोलिसांनी घरझडतीमध्ये जप्त केले आहेत. यावेळी पासपोर्ट व इतर काही कागदपत्रांवर वेगवेगळा पत्ता आढळून आला आहे. यावरून गुन्हेगारी प्रवृत्तीमधूनच त्याने असे केल्याचा पोलिसांचा अंदाज असून याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

खबºयांवरही मोठा खर्च
गुन्ह्यांचा उलगडा करण्यासाठी तांत्रिक तपास करूनही काही हाती लागत नसल्याने पोलिसांनी खबºयांचाही वापर केला. परंतु यावेळी संशयित गुन्हेगाराची ठोस माहिती नसताही काही खबºयांकडून माहिती मिळविण्यासाठी खूप खर्च करावा लागला.

पहिला गुन्हा तळोजाचा
रेहान कुरेशीवर २०१५ मध्ये तळोजा पोलीस ठाण्यात पॉक्सोचा पहिला गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने पंधरा अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले आहेत.

उघड झालेले गुन्हे
रेहान याने पॉक्सोच्या पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली असून त्यात नवी मुंबईतील सात गुन्ह्यांचा समावेश आहे. उर्वरित आठ गुन्हे ठाणे, ठाणे ग्रामीण, पालघर व मुंबई परिसरातले आहेत.

आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा
रेहान कुरेशी हा मूळचा उत्तर प्रदेशचा असून जन्मापासून वरळीला रहायला आहे. तिथल्या खासगी शाळेत इंग्रजी माध्यमातून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. सहा महिन्यांपूर्वी मुंबईच्या एका कंपनीत तो सेल्समनचे काम करायचा. परंतु कामादरम्यान तो नवी मुंबईत कुठे फिरायचा याची माहिती कार्यालयात देत नसल्याने तीन महिन्यातच त्याला नोकरीवरून काढण्यात आले. वडिलांच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबात आई, तीन भाऊ व बहिणीचा समावेश आहे. बहिणीचे लग्न झाले असून मोठा भाऊ दुबईस्थित असून एका भावाचे मटणाचे दुकान आहे, तर एक भाऊ दुर्घटनेत भाजल्याने घरीच असतो. २०१० ते २०१४ दरम्यान रेहान देखील नोकरी निमित्ताने दुबईस्थित भावाकडे होता. त्यानंतर सन २०१५ ते २०१७ दरम्यान तो खारघर येथील ओवे गावात रहायला होता. मात्र मागील काही महिन्यांपासून मीरा रोड येथील भावाकडे रहायला गेलेला.

Web Title: Police checked the 500-hour recording of the accused, the accused was arrested on the run

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.