अज्ञात चोरट्यांनी घातला पोलीस वसाहतीत धुडगूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:47 PM2019-05-18T23:47:42+5:302019-05-18T23:50:50+5:30
सीबीडीतील प्रकार । एकाच रात्रीत पाच घरांमध्ये घरफोडी
नवी मुंबई : सीबीडी येथील पोलीस वसाहतीमध्ये पाच घरांमध्ये घरफोडीची घटना घडली आहे. त्या ठिकाणी राहणारे पोलीस कर्मचारी सहकुटुंब गावी गेले असता, घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. त्यापैकी तीन घरांमधील ऐवज चोरीला गेला असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
उन्हाळ्याची सुट्टी लागली की, चोरट्यांकडून नागरिकांच्या बंद घरांचा शोध घेऊन त्या ठिकाणी चोरी केली जाते. त्यामुळे प्रतिवर्षी पोलिसांकडून नागरिकांना सुट्टींच्या कालावधीमध्ये चोरीच्या घटना टाळण्यासाठी घ्यायच्या खबरदारीबाबत सतर्क केले जाते. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी पोलीस वसाहतीमध्येच धुडगूस घालून तिथल्या सुरक्षेची लक्तरे काढली आहेत. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तिथल्या पाच घरांचे टाळे तोडून घरफोडीच्या उद्देशाने आत प्रवेश केला. मात्र, त्यापैकी तीन घरांमध्ये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला आहे.
उर्वरित घरांमधील व्यक्तींनी गावी जाताना दागिने सोबत नेल्याने त्यांचा ऐवज सुरक्षित राहिला आहे. पोलीस वसाहतीमधील सी ७ या इमारतीमध्ये एक, सी ५ इमारतीमध्ये तीन, तर सी ३ इमारतीमध्ये एक, अशा पाच घरांमध्ये ही घरफोडीची घटना घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामध्ये लॅपटॉप, रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा सुमारे दीड लाखाचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सीबीडी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
मात्र, पोलीस वसाहतीमध्येच घडलेल्या घरफोडीच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
काही दिवसांपूर्वी निवडणुकीच्या काळात पोलिसांनी भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या होत्या. या दरम्यान बऱ्याच प्रमाणात गुन्हेगारी घटनांना आळा बसला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा घरफोडी व वाहनचोरीच्या घटना घडू लागल्याने गुन्हेगार डोके वर काढत असल्याचे दिसून येत आहे.