पोलीस वसाहतीची होणार पुनर्बांधणी
By admin | Published: April 19, 2017 12:53 AM2017-04-19T00:53:41+5:302017-04-19T00:53:41+5:30
मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीबीडी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवी मुंबई : मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या सीबीडी येथील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सोमवारी त्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला. या निर्णयामुळे वसाहतीतील ३२४ कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबईची उभारणी करताना सिडकोने १९७९ मध्ये पोलिसांच्या निवासासाठी सीबीडी सेक्टर १ येथे वसाहत बांधली. त्यानंतर ही वसाहत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आली. या वसाहतीत अधिकारी व कर्मचाऱ्यांसह एकूण ३२४ कुटुंबे वास्तव्याला आहेत. सुरुवातीच्या काळात बांधकाम विभागाकडून या वसाहतीची देखभाल करण्यात येत होती. परंतु मागील दहा वर्षांपासून या विभागाने देखभाल व दुरुस्तीकडे पाठ फिरविल्याने सध्या या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. इमारती जीर्ण झाल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. छताचे प्लास्टर निखळण्याच्या घटना नेहमीच्याच झाल्या आहेत.
मलनि:सारण वाहिन्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. एकूणच येथील रहिवाशांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सदर वसाहतीची पुनर्बांधणी करावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी २00४ पासून हा प्रश्न लावून धरला आहे. विधिमंडळ अधिवेशनात लक्षवेधी मांडून या प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले. तसेच विविध स्तरावर बैठका घेवून पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीसाठी राज्य सरकारकडे आग्रही भूमिका घेतली होती. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
सोमवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सीबीडीतील पोलीस वसाहतीच्या पुनर्बांधणीच्या मुद्द्यावर शिक्कामोर्तब केला आहे. सिडकोला देय असलेल्या ३ कोटी १५ लाख रुपयांपैकी २ कोटी ८0 लाख रुपयांचे व्याज व दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी आग्रही भूमिका घेतली होती. उर्वरित ३५ लाख रुपयांची रक्कम सिडकोला अदा करण्याचे पोलीस आयुक्त नगराळे यांनी मान्य केल्याने दीर्घकाळ रखडलेल्या या वसाहतीच्या पुनर्बांधणीचा मुद्दा निकाली निघाला आहे.
या बैठकीला आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह नवी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, सिडकोच्या मालमत्ता विभागाचे व्यवस्थापक फैयाज खान, गृहविभागाचे सचिव, मुख्य अभियंता एम.एन. डेकाटे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)