बेकायदेशीर राहणाऱ्या विदेशींसाठी पोलिसांचे कोम्बिंग; चौकशीसाठी घेतले ताब्यात
By सूर्यकांत वाघमारे | Published: September 1, 2023 06:52 PM2023-09-01T18:52:05+5:302023-09-01T18:52:18+5:30
नवी मुंबई : व्हिजा संपल्यानंतरही देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सहा ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग ...
नवी मुंबई : व्हिजा संपल्यानंतरही देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तालय क्षेत्रात सहा ठिकाणी पोलिसांनी कोम्बिंग केले. त्यामध्ये काही विदेशी नागरिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. तर काहींकडे अमली पदार्थ सदृश्य पदार्थ आढळून आले असून त्यांची रात्री उशिरापर्यंत चाचपणी सुरु होती.
शिक्षण, व्यवसाय यांच्या निमित्ताने देशात आलेल्या विदेशी व्यक्ती व्हिजा संपल्यानंतरही परत मूळ देशात जात नाहीत. त्यामध्ये बांग्लादेशी व नायझेरियन व्यक्तींचा मोठा समावेश वेळोवेळी दिसून आलेला आहे. त्यापैकी बहुतांश नायझेरियन व्यक्ती ह्या अमली पदार्थांच्या तष्क्रीत सहभागी आहेत. तर घुसखोर बांग्लादेशी व्यक्ती ह्या बांधकाम किंवा इतर ठिकाणी मजूर म्हणून नोकरी मिळवून वास्तव्य करत असल्याचे आढळून येते.
दरम्यान, भारतात अशा बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या इतर देशातील व्यक्तींच्या शोधासाठी मोहीम राबवण्याच्या सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केलेल्या आहेत. त्यानुसार नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात शुक्रवारी कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामध्ये परिमंडळ एक मध्ये तीन ठिकाणी तर परिमंडळ दोन मध्ये तीन ठिकाणी विदेशी नागरिकांचे वास्तव्य असलेल्या ठिकाणांवर धाडी टाकण्यात आल्या.
यामध्ये त्यांच्या घराची व कागदपत्रांची झाडाझडती घेण्यात आली. त्यात संशयास्पद वाटणाऱ्या वस्तू, पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. तर ज्यांच्या कागदपत्रांवर संशय आहे अशा विदेशी व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची पडताळणी सुरु आहे. कारवाई दरम्यान काहींकडे अमली पदार्थ सदृश्य पदार्थ आढळून आले आहेत. हे पदार्थ ताब्यात घेऊन त्यांची अमली पदार्थ विरोधी पथकामार्फत त्यांची पडताळणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.
काही वर्षांपूर्वी नवी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकारे अमली पदार्थ विक्रीत सहभागी असणाऱ्या नायझेरियन व्यक्तींविरोधात मोठी मोहीम राबवली होती. त्यानंतर बहुतांश नायझेरियन व्यक्तींनी नवी मुंबईतून पळ काढला होता. तर लॉकडाऊन दरम्यान देखील त्यांचे प्रमाण कमी झाले होते. परंतु मागील काही महिन्यात पुन्हा एकदा त्यांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नववर्षाच्या सुरवातीलाच पोलिसांनी खारघर येथे कारवाई करून नायझेरियन व्यक्तींचे अमली पदार्थ विक्रीचे मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यानंतर शुक्रवारी झालेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पुन्हा काही नायझेरियन व्यक्ती पोलिसांच्या हाती लागले आहेत.