ठरावीक कालावधीतील गुन्ह्यांमुळे पोलीस संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 03:22 AM2018-10-01T03:22:06+5:302018-10-01T03:22:29+5:30
पॉक्सो प्रकरण : जून ते सप्टेंबरमधील गुन्हे
सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : पॉक्सोच्या १५ गुन्ह्यांत अटकेत असलेल्या रेहान कुरेशीने जून ते सप्टेंबर या महिन्यांतच गुन्हे केल्याचे समोर आले आहे. तीनही वर्षातील याच महिन्यांत त्याने केलेले गुन्हे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहेत; परंतु तो सराईत गुन्हेगार असल्याने सतत चुकीची माहिती देऊन पोलिसांची दिशाभूल करत असल्याने अशा अनेक बाबींचा उलगडा करण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
नवी मुंबईसह मुंबई, ठाणे ग्रामीण व ठाणे शहर, तसेच पालघर परिसरातील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना मागील तीन वर्षांपासून घडत होत्या; परंतु चारही आयुक्तालयाच्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू असतानाही तो हाती लागत नव्हता. सीसीटीव्ही व्यतिरिक्त त्याचा कसलाही ठोस पुरावा नसल्याने त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांची दमछाक झाली होती. अखेर नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा पोलिसांनी शिताफीने मीरारोड येथून त्याला अटक केली. चौकशीत त्याने १५ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यात २०१६ मध्ये त्याने मुंबईच्या भोईवाडा, तसेच ठाण्याच्या नवघर परिसरात गुन्हे केल्याचे समोर आले आहे.
२३ जानेवारी २०१५ मध्ये तळोजा येथेही त्याच्यावर पॉक्सोचा पहिला गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्यात जामिनावर सुटल्यानंतर त्याने हे तीनही गुन्हे केल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर नवी मुंबई, ठाणे व पालघर परिसरात अल्पवयीन मुलींवर पाळत ठेवून त्यांच्यावर अतिप्रसंग केले आहेत. काही मुलींनी धाडसाने त्याच्यापासून स्वत:ची सुटकादेखील करून घेतली होती. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात पॉक्सोचे गुन्हे दाखल आहेत.
रेहानच्या चौकशीसाठी आयुक्त व उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक नेमण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त अजय कदम हे त्या पथकाचे प्रमुख असून, गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, उपनिरीक्षक ज्योती सूर्यवंशी, जगदीश पाटील व इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
च्रेहानवर दाखल असलेले दोन गुन्हे वगळता इतर सर्व गुन्हे जून ते सप्टेंबर महिन्याच्या कालावधीतील आहेत.
च्केवळ २०१७ व १८ मध्ये एप्रिल महिन्यात प्रत्येकी एक गुन्हा आहे. याव्यतिरिक्त त्याच्यावर २०१६ मध्ये ३, २०१७ मध्ये ४ तर २०१८ मध्ये ५ गुन्हे दाखल असून त्याची कबुलीही त्याने दिलेली आहे. इतरही गुन्हे त्याने केल्याची शक्यता असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. मात्र, समोर आलेले गुन्हे जून ते सप्टेंबर महिन्यांतच का केले? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यामागे काही ठोस कारण आहे का की निव्वळ योगायोग, याचाही उलगडा पोलिसांना करावा लागणार आहे. तो सतत चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असल्याने पोलिसांपुढे तपासाचे आव्हान वाढले आहे.