पोलिस निघाले डान्सबार तपासणीच्या मोहिमेवर; कारवाईला वेग

By सूर्यकांत वाघमारे | Published: March 13, 2024 09:45 AM2024-03-13T09:45:52+5:302024-03-13T09:47:26+5:30

दिवसभर पोलिस दलात ‘लोकमत’ची चर्चा

police embark on dance bar inspection mission speed to action | पोलिस निघाले डान्सबार तपासणीच्या मोहिमेवर; कारवाईला वेग

पोलिस निघाले डान्सबार तपासणीच्या मोहिमेवर; कारवाईला वेग

सूर्यकांत वाघमारे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डान्सबारचा गोरखधंदा ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर पनवेल पोलिस आता डान्सबार बंद करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत. पनवेल परिसरातील डान्सबारचे परवाने, नोकरनामे तपासले जातील आणि जिथे कुठे लाइव्ह ऑर्केस्ट्राच्या नावावर डान्सबार सुरू असतील ते बंद पाडले जातील, अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉजिंग, बोर्डिंग आणि फार्म हाउसचे पेव फुटले आहे. त्यात भर म्हणून नवी मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रात ३९ ऑर्केस्ट्रा बार, तर ७०  सर्व्हिस बार चालत आहेत. बहुतांश ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्रास डान्सबार चालत असल्याने त्याठिकाणी रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर होत आहे. त्यावरून नवी मुंबई, पनवेल गुन्हेगारांचे नवे आश्रयस्थान ठरत असल्याचा आरोप या भागातील मध्यमवर्गीय करत आहेत. 

फार्महाउसना अभय कोणाचे?

शनिवार, रविवार या भागातील फार्महाउसवर मोठी गर्दी होत असते. त्याठिकाणी काय चालते?  कोणाला आश्रय दिला जातो? या गोष्टी समोर येत नाहीत. मोहोळच्या हत्येतील गुन्हेगारांना आधी एका फार्महाउसवर आश्रय दिला, नंतर त्यांना याच परिसरातील एका ढाब्यावरून अटक करण्यात आली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. बड्या राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे काही अधिकारी पनवेलमध्ये हे व्यवहार बिनदिक्कत करत असल्याची पोलिस दलात चर्चा आहे. 

मागील काही वर्षांत राज्य तसेच राज्याबाहेरील गुन्हेगारांना नवी मुंबईतून अटक झाली आहे. इतर शहरात अथवा राज्यात गुन्हे करून कारवाईपासून वाचण्यासाठी नवी मुंबईत आश्रय मिळवला जात आहे. त्यासाठी शहरातील लॉजिंग, बोर्डिंग, फार्महाउस यांचा आधार घेतला जात आहे.

नुकतेच पुण्याच्या बहुचर्चित शरद मोहोळ हत्या प्रकरणातील प्रमुखाला पनवेलमधील ढाब्यावरून अटक केली होती, तर दीड वर्षापूर्वी पनवेल तालुका पोलिस ठाणे हद्दीत घडलेल्या सराईत गुन्हेगार संजय कार्ले हत्या प्रकरणातही पुण्याच्या टोळीचा हात असल्याचे उघड झाले होते. शहराच्या इतर ठिकाणावरूनदेखील राज्याबाहेरील गुन्हेगारांना यापूर्वी अटक केली आहे.

पनवेल परिसरात डान्सबार चालणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे. कुठे सुरू असल्यास त्याठिकाणी कारवाई केली जाईल. यासाठी पथकांचे बार परिसरातील राउंड वाढविण्यात आले आहेत. शिवाय बार कामगारांचे नोकरनामे तपासले जाणार आहेत. - विवेक पानसरे, उपायुक्त, परिमंडळ दोन.

 

Web Title: police embark on dance bar inspection mission speed to action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.