आंदोलन हाताळण्यात पोलिसांचेही अपयश; गोपनीय शाखेचाही जनतेशी संवाद तुटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 04:00 AM2018-07-29T04:00:19+5:302018-07-29T04:00:28+5:30

मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले.

Police fail to handle agitation; Confidential communication of the public is also broken | आंदोलन हाताळण्यात पोलिसांचेही अपयश; गोपनीय शाखेचाही जनतेशी संवाद तुटतोय

आंदोलन हाताळण्यात पोलिसांचेही अपयश; गोपनीय शाखेचाही जनतेशी संवाद तुटतोय

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : मराठा आंदोलनादरम्यान सर्वात मोठा उद्रेक नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात झाला. आंदोलकांनी चौकी व वाहनांची जाळपोळ करून पोलिसांनाही जखमी केले. शांततेमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाचा अचानक भडका उडेल, याचा अंदाज पोलीस यंत्रणेला आला नाही. वरिष्ठांकडून वेळेत ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने मोठा उद्रेक झाला. पहिल्या दिवशीची स्थिती हाताळण्यात यंत्रणेला अपयश आले असून, वरिष्ठांच्या फसलेल्या रणनीतीबरोबर गोपनीय शाखेच्या जनतेशी तुटत चाललेल्या संवादामुळे ही स्थिती ओढवल्याचेही मानले जात आहे.
मराठा क्रांती मोर्चाची आतापर्यंतची सर्व आंदोलने राज्यातील इतर शहरांप्रमाणे नवी मुंबईमध्येही शांततेमध्ये पार पडली. २५ जुलैच्या बंदची रणनीती ठरविण्यासाठी एक दिवस अगोदर माथाडी भवनमध्ये समाजाच्या सर्व संघटना व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. बंद शांततेमध्ये पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले. समन्वय समितीने त्यांची नावे व मोबाइलनंबरसह पत्रक सोशल मीडियावरून सर्व समाजबांधवांपर्यंत पोहोचविण्यास सुरुवात केली होती. वाशीतील शिवाजी चौकात काही वेळ रास्ता रोको किंवा जास्तीत जास्त पोलिसांच्या सहमतीने काही वेळ महामार्ग रोखण्याचे निश्चित करण्यात आले होते. पनवेलमध्येही अशाच पद्धतीने शांततेमध्ये आंदोलन करण्याचे निश्चित करण्यात आले होते. सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून शांततेमध्येच आंदोलन सुरू झाले होते. दोन्ही महानगरांमध्ये दुपारपर्यंत आंदोलन शांततेमध्येच सुरू होते; परंतु दुपारनंतर आंदोलन उग्र होऊ लागले. महामार्गासह अंतर्गत रोडवरही आंदोलकांनी ठिय्या मांडला. सर्वच रस्ते, ट्रान्सहार्बर मार्ग रोखल्यामुळे शहरवासीयांची कोंडी होऊ लागली. आंदोलकांकडून व कोंडी झालेल्या शहरवासीयांकडून सोशल मीडियावर भडक प्रतिक्रिया उमटू लागल्या. आंदोलनामध्ये नेहमीच्या कार्यकर्त्यांची जागा नव्याने आलेल्या जमावाने घेण्यास सुरुवात केली, यामध्ये काही समाजकंटक घुसल्याची चर्चाही सुरू झाली. या सर्व गोष्टींचे गांभीर्य यंत्रणेला वेळेत आले नाही.
दुपारनंतर आंदोलक आक्रमक होत गेले व त्यांना वेळेत शांत करण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आले. दुपारनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली. आंदोलक व पोलिसांमध्ये चकमक होऊ लागली. कळंबोलीमध्ये पोलीस उपआयुक्तांसह अनेक कर्मचारी जखमी झाले. पोलीस व्हॅन जाळण्यात आली. कोपरखैरणे परिसरामध्येही वरिष्ठ पोलीस अधिकाºयांसह कर्मचारी जखमी झाले. पोलीस चौकी जाळण्याचा प्रयत्न झाला. राज्यात सर्वात मोठा भडका नवी मुंबईमध्ये उडाला. आंदोलनाला वेगळी दिशा मिळत असल्याचे उशिरा पोलिसांच्या लक्षात आले किंवा वेळेत लक्षात आले; पण उपाययोजना उशिरा करण्यात आल्या. उशिरा लाठीचार्ज, अश्रुधुरांचा मारा व इतर कडक उपाययोजना करण्यात आल्या व त्यानंतर परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ लागली. इंटरनेट सेवा बंद करण्यापासून सर्व उपाययोजना केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणामध्ये येऊ शकली. पोलिसांना आंदोलनाच्या व्याप्तीचा व दुपारनंतर सोशल मीडियातून सुरू झालेल्या भडकावू संदेशांचा वेळेत अंदाज आला असता, तर कदाचित भडका उडालाच नसता.

पोलीस आयुक्तांच्या
बदलीची पुन्हा चर्चा
मराठा आंदोलनाचा नवी मुंबई व पनवेलमध्ये भडका उडाला. पोलिसांनी चांगली कामगिरी केली. एखाद्या गुन्ह्याचा उलगडा केला की सर्वांचे कौतुक होते. त्याप्रमाणे एखादा गंभीर गुन्हा किंवा घटना झाल्यानंतर तत्काळ टीकाही सुरू होते. पहिल्या दिवशी आंदोलन हाताळण्यात पोलीस अपयशी ठरल्याची चर्चा होऊ लागली असून, सहाजिकच टीकाही होऊ लागली आहे. या टीकेबरोबरच पोलीसआयुक्त हेमंत नगराळे यांच्या बदलीची व बढतीची चर्चाही सुरू झाली आहे. गृहविभागाने राज्यातील पोलीस अधीक्षक व उपआयुक्त दर्जाच्या ९५ अधिकाºयांच्या बदल्या केल्या असून, नवी मुंबईमधील दोन उपआयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. नगराळे यांचीही बदली होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या वेळी त्यांची बदली होणार की पूर्वीप्रमाणे चर्चा हवेत विरणार, याकडेही शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

दंगल नियंत्रणाची यंत्रणा कुठे होती
शहरामध्ये मोठे सण, उत्सव व निवडणुका असल्या की पोलीस रॅपीड अ‍ॅक्शन फोर्स, दंगा नियंत्रण पथके तैनात करते. कोणत्याही बंदच्या दरम्यान ही सर्व यंत्रणा शहरात सर्वत्र दिसत असते. या वेळीही ती यंत्रणा असली तरी तिचा प्रभाव सायंकाळपर्यंत फारसा जाणवला नाही. अनेक शहरवासी ही यंत्रणा कुठे होती, असा प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.

नेरुळ पोलिसांची दक्षता
आंदोलनादिवशी नेरुळमध्येही दोन हजारांचा जमाव रेल्वे स्टेशनसमोर जमा झाला होता.
रेल्वे रोको करण्यासाठी स्टेशनमध्ये घुसण्याच्या स्थितीमध्ये असताना पोलीस अधिकाºयांनी जमावाला थांबविले.
आंदोलनामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. रेल्वे अडविल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हा दाखल होऊन आयुष्यभर परिणाम सहन करावे लागतील, हे निदर्शनास आणून दिले. यामुळे रेल्वे रोको रोखण्यात यश आले व महामार्गासह पाम बीचवरील आंदोलनही शांततेमध्ये पार पडले.
शहरात वाशी व इतर ठिकाणीही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने आंदोलन हाताळले.

सायंकाळनंतर यंत्रणा दक्ष
दुपारनंतर आंदोलक आक्रमक झाले; पण त्यांना शांत करण्यात पोलीस अपयशी ठरले. सायंकाळी कोपरखैरणेमध्ये चौकीसमोरच जाळपोळ झाल्यानंतर व तुफान दगडफेकीनंतर यंत्रणा खडबडून जागी झाली. जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दिवसभराची स्थिती हाताळण्यात अपयश आलेल्या पोलिसांनी रात्रीची गंभीर स्थिती व्यवस्थित हाताळली. इंटरनेट सुविधा बंद करण्याचा अत्यंत चांगला निर्णय घेतला. तणाव असलेल्या परिसरामध्ये पोलीस परेड काढण्यात आली. कडक उपाययोजना करण्यात आल्या. दुसºया दिवशी स्वत: पोलीसआयुक्त हेमंत नगराळे कोपरखैरणे व इतर ठिकाणी परिस्थिती हाताळताना दिसत होते. अतितणावाची स्थितीही यंत्रणेने कुशलतेने हाताळली; पण पहिल्या दिवशी तेवढी दक्षता का दिसली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

Web Title: Police fail to handle agitation; Confidential communication of the public is also broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.