अमलीपदार्थ मुक्त शहरासाठी पोलिसांचा वसा; आयुक्तांची मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:05 AM2020-01-01T02:05:17+5:302020-01-01T02:07:23+5:30
वर्षभरात ६०० किलोहून अधिक साठा जप्त
- सुर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : अमली पदार्थांच्या गर्तेत चाललेल्या शहरातील तरुणाईला वाचवण्यासाठी पोलिसांकडून मोहीम तीव्र केली आहेत. त्यानुसार सरत्या वर्षात आयुक्तालय कार्यक्षेत्रातून ६०० किलोहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये गांजासह हेरॉईन, एम.डी. पावडर यासह इतर अमली पदार्थांचा समावेश आहे. या कारवायांमध्ये २०० हून अधिकांना अटक करण्यात आली आहे.
मागील काही वर्षात नवी मुंबईसह पनवेल व उरण परिसरात अमली पदार्थ विक्रेत्यांचे जाळे पसरत आहे. आयटी क्षेत्रामुळे शहरात स्थायिक झालेली तरुणाई व विद्यार्थी वर्गाला जाळ्यात ओढले जात आहे. नोकरीसह अभ्यासाचा असलेला तणाव कमी करण्याचा पर्याय म्हणून नशेचे व्यसन लावले जात आहे. तर अगोदरच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुण नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारी जगतामध्ये आपला ठसा उमटवू पाहत आहेत. या प्रकारातून गुन्हेगारांच्या टोळ्या तयार होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यामुळे सर्वसामान्यांसह महिला व मुलींमध्येही असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याची दखल घेत पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सरत्या वर्षात विशेष मोहीम हाती घेत दोन्ही परिमंडळांमध्ये उपआयुक्तांच्या नियंत्रणाखाली विशेष पथक तयार केली. परिमंडळ १ मधून सुमारे चारशे किलो तर परिमंडळ २ मधून सुमारे दहा किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. तर गुन्हे शाखा पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने वर्षभरात दीड कोटी रुपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. यात चरस, मेथॉक्युलॉन, केटामाईनचा समावेश होता.
अमली पदार्थ विक्रीच्या रॅकेटमध्ये स्थानिक गुन्हेगारांसह नायझेरियन व्यक्तींचाही समावेश असल्याचे सातत्याने आढळून आले आहे. हे अमली पदार्थ पाकिस्तान येथून दक्षिण आफ्रिका मार्गे मुंबई व नवी मुंबईत आणले जात असल्याचेही एका नायझेरियन महिलेच्या अटकेनंतर उघड झाले होते. त्यामुळे गुन्ह्यात सक्रिय असलेल्या व बेकायदा वास्तव्य करणाऱ्या नायझेरियन व्यक्तींना देशाबाहेर पाठवण्याची कारवाई नवी मुंबई पोलिसांनी केली आहे.
तरुणाईचे भवितव्य धोक्यात
व्यसनाधीन तरुणाईकडून नशेसाठी पैसे मिळवण्याकरिता गुन्हेगारी मार्ग वापरले जात आहेत. अशाच प्रकारातून रिक्षाचालकाच्या हत्येचा प्रकार कोपर खैरणेत घडला आहे. तर काही वर्षांपूर्वी व्हाईटनरच्या नशेतून अल्पयवीन मुलांनी त्यांच्याच मित्रावर हल्ला केल्याचा प्रकार करावे परिसरात घडला होता. यामुळे तरुणांचे भवितव्य उध्वस्त होत चालले असून त्यांना नशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच पोलिसांकडून सुरु असलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहीम प्रभावशाली ठरू लागली आहे.
पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात परिमंडळ एकमध्ये सर्वाधिक कारवाया करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी ६० हून अधिक गुन्ह्यांमध्ये १०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांच्याकडून ६० लाखाच्या जवळपास मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यापैकी ५६ लाख ३४ हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ उपआयुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक जी. डी. देवडे यांच्या पथकाने जप्त केले आहेत. त्यामध्ये हेरॉईनसह गांजा, एम.डी. पावडर व इतर अमली पदार्थांचा समावेश आहे.
परिमंडळ दोनमधून पोलिसांनी अमली पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी तीन गुन्ह्यात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तर अमली पदार्थांची नशा केल्याप्रकरणी १६ गुन्ह्यांमध्ये ३६ जणांवर कारवाई केली आहे.
गुन्हे शाखा उपआयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक आयुक्त अजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरिक्षक रविंद्र बुधवंत यांच्या पथकाने वर्षभरात सुमारे दिड कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. याप्रकरणी ५३ गुन्हे दाखल असून त्यामध्ये ८१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
परिमंडळ एकमधील कारवाई
१९ जानेवारी - आठ किलो गांजा जप्त
१७ जून - ८५ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त
११ एप्रिल - साडेचार लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त
१७ जून - ८५ लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त
८ आॅक्टोबर - हेरॉईन व एमडी पावडरसह दोघा नायझेरियन व्यक्तींना अटक
१० आॅक्टोबर - ट्रॅव्हल्समधून आनलेला १०५ किलो गांजा जप्त
१६ डिसेंबर - ८९ किलो गांजाचा साठा जप्त
१८ डिसेंबर - १४ लाख रुपये किमतीचा गुटखा जप्त
गुन्हे शाखेच्या ठळक कारवाई
१६ लाख रुपये किमतीचे चरस
२९ लाख रुपये किमतीचा १८० किलो गांजा जप्त
९४ लाख रुपये किमतीची ३ किलो एफ्मेटाईन जप्त
२७ लाख रुपये किमतीचे ६७७ ग्रॅम फेटामाईन जप्त