नवी मुंबई : बँकेतून बोलत असल्याचे सांगून क्रेडीट कार्डवरील खरेदीच्या आॅफर सांगण्याच्या बहाण्याने अज्ञाताने पोलिसाच्या पत्नीला १ लाख २० हजारांचा गंडा घातला आहे. गोठीवली येथे राहणाऱ्या लक्ष्मण जायभाये यांच्या पत्नी शिवाताई यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. याप्रकरणी रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लक्ष्मण जायभाये हे मुंबई पोलीस दलात असून ट्रॉम्बे पोलीसठाण्यात सध्या त्यांची नेमणूक आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी स्वत:च्या नावे क्रेडीट कार्ड घेतले होते. शुक्रवारी ते कामावर जाण्याच्या घाईमध्ये स्वत:चा मोबाइल फोन घरी विसरले होते. यादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाइलवर फोन करून पत्नी शिवाताई यांना वेगवेगळ्या आॅफरची माहिती दिली. त्यानंतर या आॅफरचा लाभ घेण्यासाठी मोबाइलवर येणारे ओटीपी देखील अज्ञात व्यक्तीने त्यांच्याकडून मिळवले. मात्र काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून ९० व ३० हजारांची रक्कम एका खात्यात जमा झाल्याचे मेसेजद्वारे समोर आले. ही बाब लक्ष्मण यांना समजताच त्यांनी क्रेडीट कार्ड तत्काळ ब्लॉक करून संभाव्य इतर फसवणूक टाळली. तर दोनदा ओटीपी मिळवून झालेल्या १ लाख २० हजार रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात रबाळे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अज्ञाताकडून पोलिसाच्या पत्नीची फसवणूक; ऑफरच्या बहाण्याने १ लाख २० हजारांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 12:16 AM