नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास वाशी रेल्वेस्थानकाबाहेर असह्य तरुणी आढळली होती. तिला पोलीस ठाण्यात आसरा देऊन दुसऱ्या दिवशी आश्रमात निवासाची सोय केली होती. यादरम्यान पोलीस व आश्रम चालकांनी त्या महिलेच्या पश्चिम बंगाल येथील कुटुंबीयांचा शोध घेऊन तिला त्यांच्या ताब्यात दिले.वाशी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सोपान राखोंडे हे सहकाऱ्यांसह २५ डिसेंबर रोजी रात्रगस्तीवर होते. यादरम्यान मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास एक २७ वर्षीय तरुणी वाशी रेल्वेस्थानकाबाहेर दिसून आली होती. त्यामुळे राखोंडे यांनी तिच्याकडे चौकशी केली असता, ती एकटीच फिरत असल्याचे समोर आले. यामुळे तिच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी त्या रात्री तिच्या राहण्याची सोय पोलीस ठाण्यात महिला कक्षात केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिला खारघर येथील भार्गवी शंकर ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले होते. पोलिसांनी तिच्याकडे केलेल्या चौकशीत ती पश्चिम बंगालची असल्याचे समोर आले. कौटुंबिक कारणावरून घर सोडून आली असल्याचेही उघड झाले. मात्र, नवी मुंबईत येईपर्यंत तिच्याकडील पैसे संपल्याने ती काही दिवसांपासून वाशी रेल्वेस्थानक परिसरात राहत होती.
असह्य अवस्थेत ती पोलिसांच्या नजरेस पडल्यामुळे व त्यांनी दिलेल्या आधारामुळे संभाव्य धोक्यांमधून ती वाचली आहे. दरम्यान आश्रमामध्ये तिला ठेवल्यानंतर संस्थेच्या अध्यक्षा मधुसूदन आचारी व वाशी पोलीस तिच्या कुटुंबीयांचा शोध घेत होते. अखेर पश्चिम बंगालच्या बारासात गावात राहणाऱ्या तिच्या कुटुंबीयांची माहिती समोर आली. त्याठिकाणी ती आजीसह राहायला होती. मात्र, कौटुंबिक कारणावरून ती घर सोडून रेल्वेने मुंबईत आल्यानंतर निवाऱ्याचा शोधात ती नवी मुंबईत आली होती. रविवारी तिला सुखरूप तिच्या नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.