- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईपरदेशी पाहुणे म्हणून देशात येणाऱ्या नागरिकांपैकी नायजेरियन हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. लॉटरी स्कॅम, फिशिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत सहभाग असलेल्या नायजेरियन नागरिकांवर विचारपूर्वक कारवाई करावी लागत आहे. अशा गुन्ह्यांचा खटला न्यायालयात उभा राहिल्यानंतर तो निकाली लागेपर्यंत या परदेशी गुन्हेगारांचा संपूर्ण भार पोलिसांवर पडत आहे. आॅनलाइन पद्धतीने होणाऱ्या फसवणुकीच्या गुन्ह्यांची ओळख नायजेरियन स्कॅम म्हणून देशभर झालेली आहे. नोकरी अथवा शिक्षणाच्या निमित्ताने भारतात आलेले हे परदेशी पाहुणे देशभर गुन्हेगारीचे जाळे पसरवत असून, त्यापैकी अनेक जण व्हिसा संपल्यानंतरही भारतात अवैध वास्तव्य करत आहेत. परंतु अशा नायजेरियन नागरिकांना शोधून त्यांची मायदेशी रवानगी करणे किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे पोलिसांना तापदायक ठरत आहे. यामुळे अनेक प्रकारांमध्ये पोलिसांकडूनही त्यांच्यावर कारवाईला टाळाटाळ केली जाते. त्यामुळे या परदेशी पाहुण्यांना वेळीच आवर घालण्यासाठी शासन स्तरावरच निर्णय घेण्याची गरज भासू लागली आहे.मुंबईनंतर नवी मुंबईत नायजेरियन नागरिकांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. त्यापैकी बहुतेक जण व्हिसा संपल्यानंतरही अवैध वास्तव्य करत असल्याचे पोलिसांनी यापूर्वी केलेल्या अनेक कारवायांमधून सिध्द झाले आहे. पर्यटनाच्या बहाण्याने ठिकठिकाणी फिरत असतानाच त्यांच्याकडून अमली पदार्थांची तस्करी देखील केली जाते. अशा काही नायजेरियनवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाया देखील केलेल्या आहेत. परंतु एका नायजेरियनवर कारवाई केल्यानंतर दुसऱ्यावर कारवाईपूर्वी त्यांना विचार करणे भाग पडत आहे.गुन्हेगारी मानसिकतेच्या या परदेशी पाहुण्यांना आवरण्यासाठीच पोलिसांना मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लावावे लागते. कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून होणाऱ्या शक्तिशाली प्रतिकारात वाशी पोलिसांच्या एका चौकीची तोडफोड झाली होती, तर कोपरखैरणेत कारवाईदरम्यान काहींनी दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावरून उड्या मारून पळण्याचा प्रयत्न केला होता. अशा प्रकारात एखादा दगावल्यास आपलाच बळी जायचा अशीही भीती पोलिसांना सतावू लागली आहे. नवी मुंबईत कोपरखैरणे व जुहूगाव येथे मोठ्या संख्येने नायजेरियन्सचे वास्तव्य आहे. मागील काही महिन्यात त्यांच्या सातत्याने झालेल्या झडतीमुळे काहींनी मुक्कामाचे ठिकाण बदलले आहे.परंतु काही प्रकरणांमध्ये नायजेरियन आपसातील किरकोळ गुन्ह्यात स्वत:ला गुंतवून घेत असल्याचेही दिसून येते. अशा गुन्ह्यांचा निकाल लागेपर्यंत त्यांना अपेक्षित असलेले भारतातले वास्तव्य वाढते. सद्य:स्थितीला नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात ३१ गुन्ह्यांमध्ये ५४ नायजेरियन्सवर गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी कोपरखैरणे व वाशी पोलीस ठाण्यात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद आहे. पारपत्र कायदा, आॅनलाइन फसवणूक, अमली पदार्थ तस्करी, मारहाण अशा अनेक गुन्ह्यांचा त्यात समावेश आहे. परंतु कारवाई केल्यानंतर गुन्ह्याचा निकाल लागेपर्यंत या नायजेरियन्सची करावी लागणारी उठाठेव पोलिसांना त्रासदायक ठरत आहे.पोलीस ठाण्यातही गोंधळ - नायजेरियन नागरिक पासपोर्टची मुदत संपली तरी देशातच राहण्याचा प्रयत्न करतात. अशावेळी एखादा गुन्हा करून स्वत:हून अटकही करून घेतली जाते. फसवणूक व इतर गुन्ह्यांमध्ये अटक केलेल्या अनेकांना अमली पदार्थांचे व्यसन असते. - कोठडीतही ते हंगामा करून पोलीस स्टेशन डोक्यावर घेतात. अनेक जण स्वत:ला जखमा करून घेत आहेत. - हे संशयित आरोपी न्यायालयीन कोठडीत असले तरी त्यांच्यावर संबंधित पोलीस स्टेशनला लक्ष द्यावे लागते. जामिनावर सुटलेले देशाबाहेर पळून जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी लागते. शासनाकडून पैसे मिळण्यास विलंब- संशयित म्हणून अटक केलेल्या नायजेरियन नागरिकांचा आर्थिक भुर्दंडही पोलिसांना सहन करावा लागत आहे. - अटक गुन्ह्यामधील आरोपींची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांना मूळ देशी पाठविण्याची जबाबदारीही पोलिसांचीच असते. यासाठीचा खर्च शासन देते. परंतु तो वेळेत मिळत नसल्याने त्याचा भुर्दंड पोलिसांना बसू लागला आहे.
नायजेरियनवर कारवाईचा पोलिसांना ताप
By admin | Published: March 28, 2016 2:34 AM