पोलिसांंच्या हाती लागले महत्त्वाचे सुगावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 01:07 AM2017-10-30T01:07:45+5:302017-10-30T01:08:00+5:30
वाशी येथील व्यापा-याच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले आहेत.
नवी मुंबई : वाशी येथील व्यापा-याच्या घरावर पडलेल्या दरोडा प्रकरणी पोलिसांच्या हाती महत्त्वाचे सुगावे लागले आहेत. त्याद्वारे लवकरच दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या जातील असा पोलिसांचा विश्वास आहे, तर दरोड्यापूर्वी घराची पाहणी करून कट रचण्यात आला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
वाशी सेक्टर १७ येथे राहणाºया अरुण मेनकुदळे या व्यापाºयाच्या घरी शुक्रवारी सकाळी दरोडा पडला. यामध्ये २ कोटी ९ लाख रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे. कुरिअर कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगून मिठाईचे पार्सल देण्याच्या बहाण्याने एक महिला व पुरुष मेनकुदळे यांच्या घरी गेले होते. यानंतर घरातील व्यक्तींनी दरवाजा उघडताच दबा धरून बसलेल्या पाच व्यक्तींनी आत प्रवेश करून पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकला. या संपूर्ण प्रकरणाचे सीसीटीव्हीमध्ये चित्रीकरण झाले असून, सर्वच दरोडेखोरांचे चेहरे दिसत आहेत. यानुसार त्यांची छायाचित्रे सर्वच पोलीस ठाण्यात पाठवण्यात आली असता, ते सर्व जण मुंब्रा येथील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागल्याचे सूत्रांकडून समजते. शिवाय दरोडा टाकल्यानंतर चोरीच्या कारमधून त्यांंनी पळ काढल्याची शक्यता वर्तवली जात असून, शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेतला जात आहे. या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी गुन्हे शाखा व परिमंडळ एकचे पोलीस संयुक्त तपास करत आहेत. याकरिता अनेक तपास पथके तयार करण्यात आली असून काही पथके राज्याबाहेर रवाना करण्यात आली आहेत. सीवूड येथील पॉप्युलर फायनान्सवरील दरोड्यानंतर शहरात हा मोठा गुन्हा घडला आहे. त्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.
मेनकुदळे यांच्या घरी दिवाळीमध्ये काही प्रमाणात कपाटाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. त्यापैकी एखाद्या कामगाराने गुन्हेगारांना टिप दिली का ? याचा देखील तपास पोलिसांना करावा लागणार आहे. तसेच दरोडा टाकणाºया टोळीतील दोघांनी घटनेच्या एक दिवस अगोदर मेनकुदळे यांच्या घरी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जावून हेरगिरी केल्याचेही तपासात समोर आले आहे.